दमलेल्या बाबाची गोष्ट
नवरा ऑफिसमध्ये गेला आणि माझी आवराआवर सुरू झाली. आज अंथरुणं पांघरुणंं धुवायला काढायची असं मी म्हणत होते, एवढ्यात मोबाईल वाजला म्हणून मी फोन घेतला, कन्येचं नाव दिसलं म्हणून मी खुश झाले. गेल्या महिन्याभरात किमान दहा स्थळांचे फोटो मी पाठवले होते. तिचे एवढे फोन आले; पण कुठल्या स्थळाबद्दल तिने होकार कळवला नव्हता. पण माझा अंदाज होता एक दोन दिवसात ती निश्चित कळवेलच, कदाचित त्यासाठीच तिचा अचानक फोन असेल ह्या उत्सुकतेने मी फोन उचलला.
"मग काय, आज सकाळी सकाळीच फोन, म्हणजे भारतात सकाळ गं, नाहीतर तुझा रात्रीचा फोन ठरलेला. हाच फक्त सकाळी आला. आईशीच काही बोलायचे का? कुठला फोटो आणि कुठलं स्थळ तुला पसंत सांग लवकर?”
"अगं आई, त्या करताच मी फोन केला. तू मला एवढ्या स्थळांचे फोटो पाठवू नकोस, माझ्या लग्नाची तयारीपण करू नकोस, आम्ही लग्न ठरवलंय.”
लग्न ठरवलं हे ऐकून माझा श्वासच अडकला. "अगं आम्ही म्हणजे कोणी?”
"मी आणि जॉन ने.”
मी घाबरून किंचाळले, ”अगं कोण हा जॉन?”
"अग आई, मागे मी तुला फोटो पाठवलेला ना जॉनचा.”
"अगं असे तुझ्या मित्र-मैत्रिणींचे फोटो तू नेहमीच पाठवतेस, माझ्या कसं लक्षात राहील जॉन कोण आणि कोणता ते.”
"अगं जॉन, जॉन विली त्याचं नाव, पॉप गायक आहे तो.”
"केवढा धक्का दिलास तू अमिता, मी तुझ्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती, तुझ्या बाबाला आता केवढा धक्का बसेल माहिती आहे? आणि काकांना मावशी ना काय सांगू गं मी?”
मी रडू लागले. फोन बंद करून खुर्चीत बसले. केवढ्या अपेक्षा या मुलीकडून ठेवल्या होत्या आम्ही? तिच्या लग्नाच्या तयारीसाठी काय काय जमवत होते मी. तिचा बाबा तर तिच्याबाबतीत खूपच सेन्सेटीव्ह, एकुलती एक मुलगी, त्यात पहिल्यापासून हुशार. तिच्या बाबाला गर्व होता की आपल्यासारखी हुशार म्हणून. नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेली; पण आज ना उद्या भारतात परत येईल ही आशा आम्हाला होतीच. तिची आता तिशी जवळ आली तशी आम्हाला आता जास्त काळजी वाटायला लागली. कुठूनकुठून तिच्यासाठी स्थळं येत होती, त्यातील चांगल्यात चांगलं स्थळ तिच्यासाठी आम्ही निवडणार होतो पण....
मला माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्याची, अरुणची जास्त काळजी वाटायला लागली. मी निदान रडून तरी दाखवीन, तो बाहेरून दाखवायचा नाही..पण आतल्या आत कोसळून जाईल. एकुलत्या एक मुलीसाठी आयुष्यभर झटतोय, अजून उमेदीने व्यवसाय वाढवतोय, या वयात आठवड्यातून एकदा तरी दुसऱ्या शहरात व्यवसायासाठी धावतोय, कुणासाठी हे सर्व? मी दिवसभर कॉटवर झोपून राहिले. काही करायची इच्छाच मला होईना, एवढी एवढी छोटी अमिता, शाळेत जाणारी अमिता, टेनिस खेळायला जाणारी अमिता, इंजिनीरिंगला जाणारी अमिता आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अमेरिकेत जाणारी अमिता मला आठवत राहिली. अमेरिकेत जायला माझा विरोध होताच; पण तिच्या बाबाचा तिला पाठिंबा होता.
सायंकाळी अरुणला कसं सांगायचं याचा मी विचार करत होती, कदाचित तिने बाबाला फोन केला पण असेल, मी तिचा फोन कट केला तसा बाबा फोन कट करणार नाही, तो शांतपणे तिचं म्हणणे ऐकून घेईल, आतून कोसळेल..पण बाहेर दाखवणार नाही. मला माझ्या नवऱ्याची अरुणची पद्धत माहिती होती. तो जेव्हा जास्त टेन्शनमध्ये असेल तेव्हा जास्त हसेल, गडबड करेल. आपलं टेन्शन दुसऱ्याला दाखवणार नाही. आतल्या आत आपणच ते सहन करील.
आज रोजच्यापेक्षा लवकर अरुण घरी आला. येताना माझ्या आवडीचे गुलाब जामुन घेऊन आला. तेव्हाच मी ओळखले याला सर्व कळले आहे. माझा तणाव घालवण्यासाठी याने मुद्दाम गुलाबजामून आणलेत. हाच तो माझी जास्त चेष्टा करेल, गमती जमती सांगेल. मनातल्या मनात रडत असेल पण बाहेर दाखवायचा नाही.
माझ्या हातात गुलाबजाम देऊन तो म्हणाला, "चल आज कुठेतरी फिरून येऊ.”
"आज एवढा खुशीत का, लाडक्या लेकीचा फोन आलेला दिसतो.”
"हो ना, तिनं लग्न ठरवलंय म्हणे, जॉन बरोबर.”
"मग झापलं नाहीस तिला, का खूप आनंद झाला जॉनबरोबर लग्न ठरवले म्हणून, एवढे गुलाबजामून आणलेस म्हणून विचारले.”
"विरोध करून काही उपयोग नसतो गं, उगाच आपल्या मुलीच्या मनातून आपण उतरतो, ती आता तिशीची झाली, तिचे बरे वाईट तिला कळते.”
"म्हणून काही उघड्या डोळ्यांनी आपण लग्न लावून द्यायचं? मी आई आहे तिची, कोण कुठला तो जॉन, ना ओळखीचा ना पाळखीचा, आपल्या मुलीच्या शरीराचा, मनाचा तो मालक होणार, आपण उघड्या डोळ्यांनी बघत राहायचं?”
"मग काय करू शकतो आपण? तिने लग्न करू का हे विचारलेले नाही, तिने या आधीच त्याच्याशी लग्न केले आहे ना”
"काय म्हणतोस?” मी किंचाळत विचारले.
"होय, तिने त्याच्याशी रजिस्टर लग्न केले आहे, दोन महिन्यापूर्वी.”
"आणि ती आता आम्हाला सांगते? आपली मुलगी एवढी परकी होते?”
"हे असंच असतं, तिला तिचा साथीदार मिळाला की तिचे आई-वडीलपण परके होतात, तेव्हा तिला कसलाही विरोध न करता त्यांना आशीर्वाद देणे हेच योग्य.”
"पण अरुण, मी दुखावले गेले आहे रे, माझ्या मुलीकडून मलाही अपेक्षा नव्हती. मी तिला माफ करू शकणार नाही.”
"काय करू शकतो आपण? आपण तिला मोठ्या मनाने माफ करायला हवे, आपल्याला आपल्या मुलीला गमवायचे नसेल तर आपण तिला माफ करायलाच हवे.”
"पण तिने या आधीच लग्न करून ती मोकळी झाली, आणि ही गधडी आत्ता सांगते लग्न केले म्हणून? आपले संस्कार कुठे कमी पडले का? आणि आम्ही आमच्या नातेवाईकांना काय सांगायचे? तिने दोन महिन्यापूर्वी लग्न केले म्हणून? माझी आई काय म्हणेल? माझ्या बहिणी, भाऊजी, तुझे गावचे भाऊ, काय उत्तर द्यायचे त्यांना?”
"उत्तर हे द्यावेच लागेल, लग्न याआधी झाले हे कळवायचे नाही कुणाला, मी अमितशी बोलतो, तिला म्हणतो तुम्ही दोघेही भारतात या, आपण त्यांचे परत इथे लग्न लावूया, एखादे रिसेप्शन ठेवूया, त्याला सर्वांना बोलऊया, आणि एक लक्षात ठेव, People's memory is always short कोणाला फारसे आठवणार पण नाही काही दिवसांनी.”
मी जेवण न करता उशीत डोकं खुपसून रडू लागले, अरुण येरझाऱ्या घालत होता. त्याच्या मनात केवढा कल्लोळ माजला असेल याची मला कल्पना होती. काही वेळानंतर अरुण फोनवर बोलल्याचे मला ऐकू येत होते.. निश्चितच तो अमिताशी बोलत असणार.
सकाळी अरुण मला म्हणाला, पुढील महिन्यात अमिता आणि जॉन भारतात येत आहेत. आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठी आणि मित्रमंडळींसाठी परत एकदा त्यांचे लग्न करू. दुसऱ्या दिवशी लग्नाचे रिसेप्शन ठेऊ. आपल्याला उसना उत्साह दाखवावाच लागेल. मी गप्प राहिले, मला चहा करण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती, अरुणने सकाळी चहा केला, आपल्यासाठी आणि माझ्यासाठी नाश्ता बनवला. मग अरुणनेच धावपळ करून एक छोटा हॉल ठरवला. ५० माणसांसाठी लग्नाची तयारी केली, जुहूमधील एका मोठ्या हॉटेलात रिसेप्शन ठेवले. शंभर पत्रिका छापल्या. जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना पत्रिका आणि काहींना फोन करून आमंत्रण दिले. सर्वांनाच धक्का बसला, माझी आई, बहिणी, अरुणची बहीण, भाचा, भाची सर्वजण आश्चर्यचकित झाले. कोणाला काही अंदाजच नव्हता. अरुण गावी जाऊन देवांना आणि घरच्या माणसांना आमंत्रण देऊन आला.
लग्नाच्या आधी दोन दिवस अमिता आणि जॉन आले. जॉन मला भेटायला आला. मला तो मुळीच आवडला नाही. वाढवलेले केस, दाढी, ढगळ कपडे, तोंडात सतत इंग्लिशमध्ये शिव्या, भारताला कमी लेखणे. पण मी असहाय्य होते, माझ्या मुलीने त्याच्याशी लग्न केले होते, अरुणला पण तो आवडला नव्हता हे कळत होते, पण अरुण तोंड मिटून गप्प होता.
यावेळी माझी मुलगी मला अनोळखी वाटली, तिचे प्रेम आटून गेले की काय अशी मला शंका आली. ती तिच्या बाबांना स्पष्टपणे म्हणाली, "अमिता - बाबा, आता मी फारशी भारतात येणार नाही, तुम्हा दोघांना वाटल्यास तुम्ही अमेरिकेत या. जॉन हा अमेरिकेतील मोठा पॉप सिंगर आहे. त्याच्या गाण्याचे त्याला खूप पैसे मिळतात. मीपण नोकरी सोडणार नाही. मला अमेरिकेत डॉलर्समध्ये पैसे मिळतात. त्यामुळे यापुढे माझ्यासाठी पैसे जमवू नका. आता दोघांनी आराम करा. व्यवसाय कोणाकडे तरी सोपवून मोकळे व्हा.”
तिचे हे बोलणे ऐकून तिचा बाबा गप्पच झाला. आमच्या समाधानासाठी अमिता आणि जॉन यांचे आमच्या पद्धतीने छोटेसे लग्न लावले. दुसऱ्या दिवशी जुहूमधील मोठ्या हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवले. माझ्या माहेरील सर्वजण हजर होते, अरुणच्या घरची मंडळीपण उपस्थित होती. सर्वजण अभिनंदन करत होते, कौतुक करत होते, पण मला कळत होतं काही काही लोकांच्या डोळ्यात कुचेष्टा होती, काहींच्या सहानभूती. प्रत्येकाच्या डोळ्यात मी वाचत होते, एकुलती एक मुलगी आई-वडिलांना न जुमानता निघाली असल्या धेंडाबरोबर लग्न करून.
दोन दिवस मुंबईत राहून अमिता आणि जॉन अमेरिकेला निघाले. मला वाटले होते जाताना तरी अमिता माझ्या गळ्यात पडेल, मला मिठी मारून रडेल, बाबाला सावरेल... पण तसे काहीच झाले नाही. ती अतिशय आनंदात तिच्या जॉनबरोबर अमेरिकेला गेली. गाडीतून परत येताना अरुण गप्प गप्प होता. तो तसा मनस्वी, मनातील खळखळणारा समुद्र जाणवू न देणारा. मी मात्र सुन्न झाले होते. कशासाठी आणि कोणासाठी ही सर्व धडपड?
घराचे दार उघडून आम्ही दोघे घरात आलो आणि अरुण ओक्साबोक्सी रडू लागला. ”आपली लेक आपल्याला परकी झाली गं, मुंबईत आली चार दिवस पण परक्यासारखी वावरली. जन्म दिला आपण, लहानाचे मोठे केले आपण, शिक्षण दिले संस्कार दिले आपण आणि त्या जॉन पुढे आपण तिला परके झालो.”
मग मी पुढे झाले, त्याला जवळ घेत मी म्हणाले, "खूप धडपडलास तू आमच्यासाठी, मुंबईत आलास तेव्हा तुझ्याकडे काहीही नव्हतं. आपलं लग्न झालं तेव्हा तू मामाकडे राहत होतास. मग छोटासा व्यवसाय सुरू करून यश मिळवलंस. मग अमिताचा जन्म झाल्यानंतर तू आणखी धडपडलास, स्वतःची जागा घेतलीस, ऑफिससाठी जागा घेतलीस, मग पुण्याला एक पलॅट घेतलास, घर, गाडी, फर्निचर, सर्व झालं, पण हे कुणासाठी? माझ्यासाठी आणि त्यापेक्षा लाडक्या लेकीसाठी, किती धडपड करशील रे...? कुणाला त्याची काही किंमत तरी आहे का? ती आपली लेक सांगून गेली, ‘आता सर्व कमी करा' मग करा ना कमी सर्व, आपणा दोघांसाठी कितीसं काही लागणार आहें? तुमच्या गावात तुमच्या चुलत भावाबरोबर कोर्टात केस सुरु आहे दहा गुंठे जमिनीसाठी दहा वर्षे झाली त्या केसला, अजून काही निकाल लागत नाही, कशाला हवी गावची जमीन? तुमचा चुलत भाऊ झाला तरी तो तुम्हा मांजरेकर कुटुंबापैकीच आहे ना? म्हणजे तुझे आणि त्याचे आजोबा एकच. मग मिळू दे त्या मांजरेकर कुटुंबातील माणसाला. दुसऱ्यांनी जमीन खाण्याऐवजी तुझ्या कुटुंबातील एकाला मिळाली तर का नको? घेऊन टाक ती केस मागे, सर्व मांजरेकर कुटुंब एक होऊ दे.
तुझ्या मित्राचा मुलगा तुझ्याबरोबर व्यवसायात आहे, गेली कित्येक वर्षे इमानेइतबारे काम करतोय, हळूहळू त्याच्या हातात सर्व धंदा दे. पुण्यात तुझ्या बहिणीचा मुलगा अश्विन आहें, त्याला जागा नाही आहे, त्याला म्हणावं आपल्या पलॅटमध्ये राहा, हळूहळू सर्व काही कमी करायला हवं रे, जिच्यासाठी राखून ठेवलं होतं तिला त्याची गरज नाही, मग ज्यांना गरज आहे त्यांना का देऊ नये? सांभाळ स्वतःला, आम्ही बायका रडत असलो तरी आतून खंबीर असतो, लहानपणापासून अनेक त्याग करायची सवय असते बायकांना.
आपल्या आई-वडिलांना, भावा बहिणींना सोडून आम्ही नवऱ्याच्या घरी जातो, आमचं नावसुद्धा विसरतो आम्ही, पण तुम्ही पुरुष बाहेरून कणखर दाखवता; पण मनातून मेणासारखे मऊ असता. आपली लेक आपल्याला टाटा करून गेली, तिच्या मनातही आलं नाही की आपल्या आई-वडिलांच्या मनाची काय अवस्था झाली असेल.
नटसम्राट नाटकात गणपतराव बेलवलकर बोलून गेलेत, आपण उगाच समजतो, आपण आई झालो, बाप झालो, खरं तर आपण कुणीच नसतो. अंतराळात फिरणारा एखादा आत्मा वासनेच्या जिन्याने खाली उतरतो, आणि आम्ही समजतो आई झालो, बाबा झालो.
अरुण, आपली पोर आपल्यासाठी तीस वर्षांपर्यतच होती असं म्हणायचं आणि गप्प राहायचं. त्यापेक्षा तूझ्या ऑफिसमधील शरद सतत तुझी काळजी करतो, तुला किंवा मला बरं नसतं तर त्याचा जीव कासावीस होतो, तो जवळचा नाही का?
अरुण, पुरे झालं हे शहर, इथे धड श्वास घायला मिळत नाही, पुरे झाले पैशासाठी धावणे.... आता इथला पसारा कमी करून तूझ्या गावी जावू, जुने घर आहें, ते नवीन बांधू, तुम्ही मांजरेकर एक व्हा, पुन्हा पूर्वी सारखे सण साजरे करूया.”
माझे बोलणे अरुणला पटले असावे बहुतेक, डोळे पुसत तो मान हलवत होता, मी त्याला थोपटता थोपटता सलील कुलकर्णी म्हणतो ते गाणे गुणगुणु लागले.
"सांगायचे आहें माझ्या सानुल्या तुला,
दमलेल्या बाबाची कहाणी तुला,
तूझ्या जगातून बाबा हरवेल का गं,
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
ना.. ना... ना, ना.. ना.. ना...”
- प्रदीप केळूसकर