गेट नंबर पाच  

जगात इतकी सौन्दर्य स्थळे असताना तुला असं काय लिहायला साहित्य मिळालं की गेले काही महिने फक्त शिवाजी पार्क वर लिहितोय. कारण अगदी सोप्प आहे एकतर ते आमच्या तीन जीवश्य कंठश्य, लाडक्या महापुरुषांच्या जीवनाशी, नावांशी  निगडित आहे. नावे सांगण्याची गरजच नाही. शिवाजी पार्क मध्ये फिरताना एक वेगळीच ऊर्जा मिळते. आणि फेरी मारताना प्रत्येक गेटला नावे आहेत आणी प्रत्येक गेटचे महत्व आहे. तर फेरी मारताना आपण गेट क्रमांक पाचजवळ पोहचतो. या गेटजवळच क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांचे यथोचित स्मारक बनवले आहे. बरोब्बर त्या स्मारकासमोर मैदानात उभे राहायचे आणि फक्त येणारी हवा नुसती फुपफुसात भरून घ्यायची. फक्त शांत उभे राहायचं. एक वेगळीच ऊर्जा भरून घेतल्याचे समाधान लाभते. लांबवर उद्यान गणेश गर्द झाडात लपलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा, मागील फुट पाथ वरील स्वा. सावरकर स्मारकाचा फक्त निओन साईन फलक, आजूबाजूला सुगीचे दिवस दिसतात आणि समोरून येणारा तो वारा आणी ती हवा. फक्त मनसोक्त भरभरून घ्यावा. आजकाल मनसोक्त शुद्ध हवा दुरापास्त झाली आहे. जवळजवळ प्रत्येकजण सुशिक्षित आहे; पण सुसंस्कृत नाही. स्वच्छतेच्या बाबतीत तर इतके उदासीन आहोत की सांगता सोय नाही. मुंबईतील किमान एकतरी गल्ली दाखवा जी खरोखरच स्वच्छ आनंदी असेल. मग स्वच्छ हवा कशी मिळेल?

 अगदी शिवाजी पार्कचा कट्टादेखील गर्दूल्ले आणि नशाबाजानी वेढलेला आहे त्यात सो कॉल्ड आपली लाडकी कुत्री घेऊन आणि त्यांना प्रेमानं घास भरवणारी माणसं. आठवलं.. त्या उद्यान गणेश मंदिराच्या आवारात एक कुत्रा आहे. आता वार्धक्यामुळे का कशाने रोगजडीत का पीडित कुत्रा सडक्या अवस्थेत फिरत असतो. अत्यन्त कुबट उग्र दर्प सुटलेला असतो माझीच गणरायाला विनंती असते याला घेऊन जावे या पृथ्वीतलाहून. निदान आम्ही तरी शांततेत, भक्तीभावाने दर्शन घेऊ. तीच गत दादरच्या कबुतरखान्याची ! दिवसेंदिवस हा इतका उपद्रवी होत चालला आहे की या पक्षाला शांतिदूत का म्हणावे हेच कळत नाही. आरोग्य हा विषयच मुळी सर्वच धर्मांशी निगडित आहे. तरी त्यात धर्म आणि राजकारण.

असो अशा वेळी शुद्ध ऑक्सिजन मुंबईकरांना मिळावा अशी माझी शुद्ध भावना आहे. मग संध्याकाळी गेट क्रमांक पाच जवळ थबकतात. काहीच मिनटं तिथं उभा राहतो. शुद्ध  हवा  फुपफुसात भरून घेतो. मग काही हवा मेंदूपर्यंत पोहचली की शुद्ध प्रबोधनात्मक विचार डोक्यात येतात आणि तेच तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतो तेवढाच एका वेगळ्या वाटेवरचा शुद्ध विचार. - राजन वसंत देसाई 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रेसर - अण्णाभाऊ साठे