‘भाजपा व्हाया राष्ट्रवादी व्हाया भाजपा'

वाशी : गेल्या वर्षी राज्य विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी भाजपा आमदार संदीप नाईक यांच्या सोबत‘रामकृष्ण हरी वाजवा तुतारी', असा नारा देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) मध्ये प्रवेश केलेल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातील माजी भाजपा नगरसेवकांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे वनमंत्री ना. गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुन्हा एकदा ‘भाजपा' मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

गेल्या वर्षी राज्य विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजतात भाजप तर्फे ऐरोली विधानसभा मतदारसंघात आमदार गणेश नाईक यांना तर बेलापूर विधानसभा मतदारसंघात आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती. बेलापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी माजी आमदार तथा तत्कालिन नवी मुंबई जिल्हा भाजपाध्यक्ष संदीप नाईक इच्छुक होते. मात्र, भाजप नेतृत्वाने आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना तिसऱ्यांदा त्यांना बेलापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी बहाल केली. त्यामुळे नाराज झालेल्या संदीप नाईक यांनी ‘भाजप'ला सोडचि्ीी देत ‘ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वाशी मधील विष्णुदास भावे नाट्यगृहात तुतारी फुंकत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी' (शरदचंद्र पवार) मध्ये प्रवेश केला. यावेळी बेलापूर विधानसभा मतदारसंघातील माजी भाजप नगरसेवकांनी देखील संदीप नाईक यांच्या सोबत ‘राष्ट्रवादी' मध्ये प्रवेश केला. मात्र, विधानसभा निवडणुकीत संदीप नाईक यांना बेलापूर विधानसभा मतदारसंघात अवघ्या ३७७ मतांनी पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे ऐरोली विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक यांनी ९१ हजार मताधिक्याने विजय मिळवत मंत्री पदाची माळ गळ्यात पाडून घेतली. त्यामुळे ‘नवी मुंबई'चे राजकीय सत्ताकेंद्र पुन्हा एकदा ना. गणेश नाईक यांच्याकडे आल्याने आगामी नवी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संदीप नाईक यांच्या सोबत गेलेल्या माजी भाजप नगरसेवकांनी घरवापसी करत १८ फेब्रुवारी रोजी दादर मधील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे, ना. गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुन्हा एकदा भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, महासचिव विक्रांत पाटील, माजी खासदार डॉ.संजीव नाईक, नवी मुंबई जिल्हा भाजपाध्यक्ष रामचंद्र घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. गणेश नाईक यांचे वजन पुन्हा एकदा सिध्द
नवी मुंबई शहरातील बेलापूर विधानसभा मतदारसंघातील माजी भाजप नगरसेवकांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ना. गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुन्हा एकदा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत या माजी नगरसेवकांनी ऐनवेळी राजीनामे देऊन पक्ष विरोधी कार्य केले   म्हणून त्यांना पक्ष प्रवेश देऊ नये, याकरिता एका भाजप आमदाराने प्रचंड विरोध करत या माजी भाजप नगरसेवकांना दिवसभर ताटकळत ठेवण्यास भाग पाडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मात्र, सायंकाळी ना. गणेश नाईक यांनी सूत्रे हलवित या माजी भाजप नगरसेवकांचा भाजप मध्ये पक्ष प्रवेश करुन घेतला. त्यामुळे विधानसभा निवडणूक जिंकून मंत्री पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर माजी भाजप नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाला विरोध असताना त्यांना पक्ष प्रवेश देत ना. गणेश नाईक यांनी पक्षात आपले वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नमुंमपाच्या गलथान कारभारामुळे सहली दरम्यान एका १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यु