नमुंमपाच्या गलथान कारभारामुळे सहली दरम्यान एका १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यु
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने महापालिका शाळेतील जवळपास २२०० विद्यार्थ्यांना खालापूर येथील इमॅजिका पार्क या ऍडव्हेंचर पार्क सहलीसाठी नेले. पालिका अधिकारी, कंत्राटदार यांच्या गलथान कारभारामुळे घणसोली शाळा क्र.७६ मधील आठवीत शिकणारा विद्यार्थी आयुष सिंग याचा या सहली दरम्यान मृत्यू झाला. या संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन नवी मुंबई मनसे मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आले होते.
मुळात शैक्षणिक सहल ही ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक माहिती देणाऱ्या ठिकाणी नेण्यात याव्यात, असा राज्य सरकारचा शासन निर्णय आहे. असे असताना शासन निंर्णयाला केराची टोपली दाखवून हजारो मुलांना कडक उन्हात ऍडव्हेंचर पार्क मध्ये नेण्याचा अट्टाहास पालिका शिक्षण विभाग उपायुक्त, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी का केला? असा प्रश्न उपस्थित होतो. १० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा असे परिपत्रक असताना या सूचनेचे पालन यावेळी करण्यात आले होते का ? उन्हापासून वाचण्यासाठी मुलांना पुरेशी साधने देण्यात आली होती का? इमॅजिका मधील राईड अतिभव्य आणि धोकादायक असताना देखील पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का केला? आतापर्यंत जवळपास १० हजार हून जास्त विद्यार्थ्यांना इमॅजिका पार्क मध्ये नेण्यात आले आहे. यासाठी शिक्षण विभाग उपसंचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर केला का ? असे अनेक प्रश्न उपस्थित राहतात, असे गजानन काळे यानी सांगितले.
या शैक्षणिक वर्षात आतापर्यंत किमान पाच वेळा अशा प्रकारे हजारो मुले इमॅजिका पार्क येथे सहलीसाठी नेण्यात आली. काही दिवसांपूर्वी अशाच सहली मध्ये पालिकेच्या शाळेतील मयंक जाधव या विद्यार्थ्याला इमॅजिका पार्क येथे सर्पदंश झाला होता. इमॅजिका पार्क परिसर हा कृत्रिम पार्क आहे. येथे हिरवळ कमी आहे. सर्पदंशाची घटना ताजी असताना, उन्हाचा पारा चढलेला असताना देखील हजारो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्याची कृती ही वेगळ्या कोणत्या फायद्यासाठी तरी केली नाही ना असा दाट संशय येतो. मिळालेल्या माहितीनुसार प्रतीक गायकवाड हा पालिकेचा क्लार्क आहे. त्यालाच या सहलीचे जवळपास २ करोड रुपयाचे विना निविदा कंत्राट देण्यात आल्याचा संशय आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून कोणाच्या आर्थिक फायद्यासाठी हे सर्व केले जात आहे? असा प्रश्न गजानन काळे यांनी या प्रसंगी उपस्थित केला.
तरी अधिकारी, कंत्राटदार यांच्या अभद्र युतीमुळे एका विद्यार्थ्याचा नाहक जीव गेला आहे. गेलेला जीव परत येवू शकत नाही. परंतु उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची चौकशी समिती या संपूर्ण घटनेचा अभ्यास करण्यासाठी नेमावी. तत्पूर्वी प्रथमदर्शनी दोषी दिसणारे शिक्षण उपायुक्त व शिक्षणाधिकारी या दोघांना गुन्हा दाखल करून निलंबित करावे. तसेच मृत विद्यार्थ्याच्या पालकांना भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी गजानन काळे यांनी केली. तसेच सहलीसाठी असलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी सर्व खाजगी व सरकारी शाळांनी करण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम पालिका आयुक्त व राज्य शासनाने हाती घ्यावा, अशी देखील मागणी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रकार परिषदे द्वारे केली.
या पत्रकार परिषदेला विद्यार्थी सेना नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, रायगड जिल्हा अध्यक्ष प्रसन्ना बनसोडे, मनसे नवी मुंबई शहर सचिव सचिन कदम, विद्यार्थी सेना उप शहर अध्यक्ष योगेश शेटे, रस्ते आस्थापना शहर अध्यक्ष संदीप गलुगडे, रोजगार विभाग शहर अध्यक्ष सनप्रीत तूर्मेकर, चित्रपट सेना शहर अध्यक्ष अनिकेत पाटील हे उपस्थित होते.