आ. प्रशांत ठाकूर यांच्या बैठकीमुळे प्रदूषणकारी १५ कंपन्यांना सील

खारघर : तळोजा औद्योगिक परिसरात प्रदूषण करणाऱ्या १५ कंपन्या सील करण्यात आल्या असून, प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २०० कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ'च्या अधिकाऱ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना दिली.

तळोजा एमआयडीसी मधील रासायनिक कंपन्यांतून हवेत सोडण्यात येणाऱ्या वायू प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या आणि वायू प्रदूषण विरोधात लढा देणाऱ्या तळोजा, खारघर, रोडपाली, कळंबोली परिसरातील   दीपक सिंग, लतीश शाह, डॉ. बासुतकर, भावना गुप्ता आदी कार्यकर्त्यांनी १२ फेब्रुवारी रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट  घेवून त्यांना तळोजा औद्योगिक परिसरातील वाढत्या वायू प्रदूषणाची समस्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी तात्काळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तळोजा एमआयडीसी परिसरातील वाढत्या वायू प्रदूषणाबाबत बैठक आयोजित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार १७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात झालेल्या बैठकीत पनवेल महापालिका क्षेत्रातील वाढते प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबाबत  आमदार प्रशांत ठाकूर यांनी आढावा  घेतला.

या बैठकीत, तळोजा एमआयडीसी परिसरात हवेत विषारी वायू सोडून प्रदूषण करणाऱ्या १५ रासायनिक कंपन्या थेट सील करण्यात आल्या असून, प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २०० कंपन्यांना नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ'चे  तळोजा औद्योगिक क्षेत्र विभागीय अधिकारी सतीश पडवळ यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना दिली.

दरम्यान, तळोजा एमआयडीसी मधील रासायनिक कंपन्यांना नोटीस दिल्यामुळे प्रदूषण कमी होणार नाही. प्रदूषण करणाऱ्या कंपन्यावर योग्य ती कारवाई करण्याची तसेच तळोजा औद्योगिक क्षेत्रात रात्री नाल्यात केमिकल युक्त सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई होणे आवश्यक आहे, असे निदर्शनास आणून, वायू प्रदूषण विरोधात लढा देणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत रात्री तळोजा एमआयडीसी भागात गस्त घालण्यात यावी तसेच प्रत्येक महिन्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ द्वारे प्रदूषण नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना विषयी आढावा बैठक  घेण्यात यावी, असे आदेश बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सतीश पडवळ यांना दिले.

या बैठकीला ‘भाजपा'चे उत्तर रायगड जिल्हा सचिव कीर्ती नवघरे, युवा नेते अमर उपाध्याय, हैप्पी सिंग, प्रदूषण विरोधात लढा देणारे सामाजिक कार्यकते दीपक सिंग, भावना गुप्ता, लतिश शहा, दीपक कस्तुरी, नवीन भट्ट, ज्योत्स्ना शामला आदी उपस्थित होते.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनांमुळे रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत तळोजा औद्योगिक क्षेत्रातील फिशिंग कंपन्यांवर बंदी घालण्याची तसेच तळोजा परिसरात प्रदूषण करणाऱ्या बिल्डरांवर कारवाई करत प्रदूषण रोखण्यासाठी कामबंदीची नोटीस देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी सतीश पडवळ यांनी मान्य केली आहे.- किर्ती नवघरे, सचिव - उत्तर रायगड जिल्हा भाजपा.

वायू प्रदूषण नियंत्रणासाठी तळोजा परिसरात प्रदूषित सांडपाणी सोडणाऱ्यांवर पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्याचे तसेच तळोजा औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीचे बंद असलेले काम तातडीने सुरु करण्याचे आश्वासन प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी दिले आहे. आमदार प्रशांत ठाकूर स्वतः पुढाकार  घेवून पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणासाठी सहकार्य करीत असल्याने तळोजा परिसरातील नागरिक समाधानी आहेत. - दीपक सिंग, सामाजिक कार्यकर्ता. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘भाजपा व्हाया राष्ट्रवादी व्हाया भाजपा'