६५ इमारतींमधील रहिवाशांसाठी ‘उबाठा' आली धावून

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे खोटे कागदपत्र सादर करत ‘महारेरा'चे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या ६५ इमारती कारवाईच्या फेऱ्यात सापडल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर डोंबिवली मधील ६५ इमारती जमीनदोस्त होणार आहेत. आपले घर, संसार उघड्यावर पडणार? आम्ही जायचे कुठे? आमचे घर कोण वाचविणार? अशा चिंतेत येथील रहिवाशांच्या मदतीला ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष' धावून आला आहे.

दरम्यान, पत्रकार परिषद घेऊन या रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही, असे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदद्वारे सांगण्यास शिवसेना पदाधिकाऱ्यांना आदेश दिले होते. त्यानुसार १६ फेब्रुवारी रोजी सर्वेश सभागृहात ‘शिवसेना ठाकरे गट'तर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी सदर ६५ इमारतींमधील रहिवाशी देखील उपस्थित होते.

सदर पत्रकार परिषद प्रसंगी ‘शिवसेना ठाकरे गट'चे कल्याण जिल्हा अध्यक्ष दीपेश म्हात्रे, वैशाली दरेकर-राणे, अभिजीत सावंत, दिवा पदाधिकारी रोहिदास मुंडे, समाजसेवक पांडुरंग भोईर, आदि उपस्थित होते.

जरी सदर अनधिकृत इमारतीत नागरिक राहत असतील तरी ते आमचे रहिवासी आहे आणि आमचा पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मग या रहिवाशांसाठी आंदोलन करायला लागले तरी आमचा पक्ष आंदोलन करेल. त्यांच्यासाठी संघर्ष करावा लागला तरी आम्ही संघर्ष करण्यास तयार आहोत. महापालिका विरोधात भांडावे लागले तरी आम्ही तयार आहोत. न्यायालयीन लढाईत आम्ही लढतोच आहे, तिथे आम्ही उच्च सर्वोच्च न्यायालयांमध्ये देखील आम्ही जाणार आहोत. सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही या लढाईसाठी जाणार आहोत, असे दीपेश म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

आम्हाला या प्रकरणात कोणतेच राजकारण आणायचे नाही. आम्हाला फक्त रहिवाशांची घरे वाचवायची आहेत. सदर इमारतींचेे ज्यांनी खोटे रजिस्ट्रेशन केले आणि ज्यांनी पेपर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या, स्टॅम्प बनविले त्या किती जणांवर कारवाई  नाही. महत्वाचे म्हणजे ज्या ६५ बिल्डरांवर कारवाई झालेली आहे, ते सगळे बिल्डरच नाही. ते कुठे डमी उभे केलेली मंडळी आहेत. ज्या लोकांनी रहिवाशांना फसवले, त्यांच्यावर काहीही कारवाई केली नाही. उलट रहिवाशांवर आपले घर तुटण्याची टांगती तलवार लटकत आहे, असे दीपेश म्हात्रे म्हणाले.

पोलीस येथील रहिवाशांना पोलीस ठाण्यात बोलावतात. २-३ तास बसवून त्याच्याकडून आपले घर सोडून जाऊ असे लिहून घेत आहे. यापुढे जर पोलीस अशी भूमिका घेणार असतील आम्ही त्या इमारती तोडण्यास महापालिका प्रशासन आले तर ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'चे पदाधिकारी आणि शिवसैनिक सर्वप्रथम कारवाईला विरोध करु, आंदोलन करु, असेही दीपेश म्हात्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आदित्य ठाकरे घेणार भेट...
डोंबिवली मधील ६५ इमारतील रहिवाशी बेघर होऊ नये याकरता शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्ोणार आहेत. तर सदर इमारतींबाबत कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे महापालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

आ. प्रशांत ठाकूर यांच्या बैठकीमुळे प्रदूषणकारी १५ कंपन्यांना सील