भिवंडी मधील गुन्हेगार, ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

भिवंडी : भिवंडी मधील वाढते गुन्हेगार आणि ड्रग्स माफिया यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन केली आहे.

भिवंडीमध्ये गुन्हेगारी आणि अवैध ड्रग्ज व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर बनली आहे. ऑगस्ट-२०२४ मध्ये गुजरात एटीएस पथकाने भिवंडी येथून ८०० कोटी रुपये किंमतीचे ७९२ किलो लिक्विड एमडी ड्रग्ज जप्त केले होते. मात्र, या प्रकरणातील प्रमुख दोषींवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. भिवंडीतील ड्रग्ज व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी विशेष तपास समिती किंवा केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीची आवश्यकता आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटीत खासदार सुरेश म्हात्रे यांनी सांगितले.  

या भेटीत भिवंडीतील ड्रग्ज माफिया, तडीपार गुन्हेगार आणि संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी खासदार सुरेश म्हात्रे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली. यावेळी झालेल्या चर्चेत ‘आपल्या मागण्यांवर तातडीने योग्य ती कारवाई केली जाईल', असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार सुरेश म्हात्रे यांना दिले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे तातडीने लागू करावेत -गृहमंत्री अमित शाह