मिरा-भाईंदर महापालिकेचा २६९४ कोटींचा अर्थसंकल्प सादर
अर्थसंकल्प नागरी सेवाभिमुख -आयुक्त संजय काटकर
भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी सन २०२४-२५ चा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पात ३९६ कोटी रुपयांची वाढ करत २०२५-२६चे २६९४ कोटी रुपयांचे ८४ लाख रुपये शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आले. अर्थसंकल्पात महापालिका प्रशासनाने कोणतीही करवाढ केलेली नसून अर्थसंकल्प नागरी सेवाभिमुख असल्याचा दावा आयुक्त संजय काटकर यांनी केला आहे. दरम्यान, आयुक्त संजय काटकर यांच्या प्रशासकीय राजवटीत सादर झालेला यंदाचा सदर दुसरा अर्थसंकल्प आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात उद्यान, आरोग्य, परिवहन,शिक्षण विभागाला प्राध्यान्य देत नवीन विकसित मालमत्तांवर कर आकारणी, महापालिकेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या वास्तू, हॉल, सभागृह भाड्याने देऊन महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, सूर्या पाणी पुरवठा आणि भुयारी गटार योजना पूर्णत्वास नेण्याकडे भर देण्यात आला आहे. मिरा रोड येथे ५०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय, डायलेसिस केंद्र सुरु करणे अशा वैद्यकिय सुविधेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, मिरा-भाईंदर महापालिकेचा २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी आयुक्त संजय काटकर यांनी २ हजार २९७ कोटी जमा आणि खर्च २३ लाख शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यापूर्वीचा २०२३-२४ या आर्थिक वर्षात महापालिकेने २ हजार १७४ कोटी रुपये जमा आणि खर्चाचा अर्थसंकल्प सादर केला होता. गतवर्षीचा अर्थसंकल्प प्राथमिक शिक्षण, वैद्यकीय आरोग्य आणि पर्यावरण घटकाला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आला असल्याचा दावा प्रशासनाने केला होता.
या अर्थसंकल्पात विविध बाबींसाठी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. कोणतीही करवाढ करण्यात आली नसल्याने सामान्य नागरिकांवर कराचा बोजा वाढलेला नाही. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप १ मे रोजी होईल. मार्च २०२६ पर्यंत सूर्या प्रकल्प वाढीव पाणी पुरवठा सुरु करण्याचा संकल्प असून अर्थसंकल्प नागरी सेवाभिमुख आहे.
-संजय काटकर, आयुक्त तथा प्रशासक, मिरा-भाईंदर महापालिका.
यंदाच्या अर्थसंकल्पातील उत्पनाच्या ठळक बाबीः
मालमत्ता कर ३९८ कोटी
विकास व तत्सम शुल्क १९५ कोटी
स्थानिक संस्था कर ४०८ कोटी ४८ लाख
पाणीपुरवठा २०९ कोटी ९२ लाख
अग्नीशमनदल फी ५९ कोटी ४८ लाख
स्थावर मालमत्ता १० कोटी ९० लाख
जाहिरात फी ६ कोटी
शासन अनुदान ३७८ कोटी ४६ लाख
कर्ज ३९ कोटी ४२
खर्चाच्या ठळक बाबीः
विकास आराखड्यातील
कामासाठी भूमी संपादन ४० कोटी
सूर्या प्रकल्प वाढीव
पाणी पुरवठा जलवाहिनी १३१ कोटी ३४ लाख
भुयारी गटार
भाग-१ ७४ कोटी
भाग-२ ६० कोटी
महिला-बालकल्याण ६ कोटी ४५ लाख
शिक्षण, क्रीडा १२ कोटी ८७ लाख
परिवहन ३५ कोटी
उद्यान-वृक्ष प्राधिकरण ५४ कोटी ३७ लाख
घनकचरा व्यवस्थापन १७४ कोटी