खा. सुरेश म्हात्रे यांचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक
भिवंडी : ‘भिवंडी'चे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अकाऊंड हॅक करून त्यांच्या ई-मेल आयडी सह मोबाईल नंबर बदलल्याचे समोर आल्याने नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात हॅकर विरोधात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी सायबर पथकाच्या मदतीने तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा ‘भाजपा'चे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना पराभूत करून पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले, तेव्हापासून त्यांनी कामाचा धडाका लगावत सोशल मिडीयावर आपली छाप पाडली. त्यातच ८ ते १० फ्रेब्रुवारी दरम्यान त्यांचे इंस्टाग्राम अकाऊंड कोणीतरी अज्ञात हॅकरने हॅक केले. शिवाय अकाऊंट हॅक करुन ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबरमध्ये बदल करण्यात आल्याचे खासदार यांचे सहकारी विपुल यांच्या लक्षात आले.
दरम्यान, खा. सुरेश म्हात्रे यांच्या वतीने विपुल प्रमोद म्हात्रे यांनी १० फ्रेब्रुवारी रोजी नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन सदर प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी अज्ञात हॅकर विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम-२००० चे कलम ४३, ६६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस तपास अधिकारी प्रमोद कुंभार यांनी दिली आहे. दुसरीकडे या घटनेनंतर ठाणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.