दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा विजयी
नवी मुंबई : दिल्ली विधानसभा निवणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने ‘बेलापूर'च्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी वाशी येथील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांसह फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून जल्लोष केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात स्पष्ट बहुमत मिळाल्याने ‘भाजपा'ने अरविंद केजरीवाल यांच्या सत्तेला सुरुंग लावत दिल्लीत मोठ यश मिळवले आहे. विकास हवा असेल तर भाजप आणि नरेंद्र मोदी यांचेच नेतृत्व हवे; दुसरा पर्याय नाही, असे विधान यावेळी आ. मंदाताई म्हात्रे यांनी केले.
तसेच जनसंपर्क पक्ष कार्यालयात आयोजित जनसंवाद मेळाव्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी वाशी विभागातील तसेच नवी मुंबईतील सारसोळे, नेरुळ, तुर्भे, कोपरखैरणे आणि घणसोली मधील अनेक नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडल्या. विरंगुळा केंद्र, निवारा शेड, नवीन धार्मिक स्थळांसंदर्भातील नमुंमपा आणि सिडको संबंधित विविध कामे, आदिंचा त्यात समावेश होता. त्यावर आ. मंदाताई म्हात्रे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ संपर्क करुन सदर कामे मार्गी लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनच्या निवडणुकीत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल माजी नगरसेवक राजू शिंदे यांचा सत्कार देखील करण्यात आला.
याप्रसंगी माजी उपमहापौर अनिल कौशिक, माजी नगरसेविका माधवी शिंदे, समाजसेवक विकास सोरटे, मुकुंद विश्वासराव, प्रताप भोसकर, रामकृष्ण अय्यर, राखी पाटील, प्रमिला खडसे, मालती सोनी, मंगेश चव्हाण, महेश दरेकर, जेम्स आवारे, प्रविण चिकणे, आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.