वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
८ तास सलग चालला जनता दरबार
समस्यांचे तात्काळ निराकरण
नवी मुंबई : लोकशाहीत राज्यकर्त्यांचे देव हे जनतेमध्ये असतात" या विचाराने जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांनी दहा वर्षांनंतर पुन्हा जनता दरबाराची परंपरा सुरू केली. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या या पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
या दरबारात ठाणे जिल्ह्यासह मुंबई, व नवी मुंबईतील शेकडो नागरिक उपस्थित होते. महापालिका, सिडको, एमआयडीसी, पोलीस, वन विभागासह विविध शासकीय खात्यांचे वरिष्ठ अधिकारी देखील या वेळी उपस्थित होते. ४०० हून अधिक नागरिकांनी आपल्या समस्या, निवेदने मांडली, त्यापैकी अनेक समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले, तर उर्वरित समस्या कालबद्ध रित्या सोडविण्यात येणार आहेत. काही समस्या शासकीय आणि जिल्हास्तरावर बैठका घेऊन मार्गी लावण्यात येणार आहेत. सकाळी ११ वाजता सुरू झालेला हा जनता दरबार रात्री ७ वाजेपर्यंत शेवटचे वृत्त हाती आले तेव्हाही सुरू होता. प्रकल्पग्रस्तांचे दैवत
स्व. दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी जनता दरबारात भेट घेऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संबंधित प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या. यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट आश्वासन दिले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण स्वर्गीय दि बा पाटील असेच होईल. "जेव्हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यापारी उड्डाणे सुरू होतील, तेव्हा 'आंतरराष्ट्रीय दि. बा. पाटील विमानतळ' म्हणून उद्घोषणा केली जाईल " यासोबतच नैना प्रकल्पा संबंधी जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयासमवेत बैठक घेण्याच्या आश्वासन दिले. प्रकल्पग्रस्त बांधवांनी आपले निवेदन दिले असता गरजे पोटीची सर्व बांधकामे आणि एलआयजी, एमआयजी यांच्या जमिनी फ्री होल्ड करायला पाहिजेत, अशी भूमिका पुन्हा एकदा मांडली. जमिनी नियमित करण्याचा दर रेडी रेकनरच्या १५% सरसकट सर्व अंतरासाठी समान असावा असेही त्यांनी सांगितले. यावेळी दिव्यांग नागरिकांनीही मंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. एका दिव्यांग व्यक्तीने भावना व्यक्त करत म्हटले की, "गणेशजी नाईक हे आमचे दाता आहेत." मंत्री नाईक यांनी दिव्यांगांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. दिव्यांग बांधवांना उदरनिर्वाहासाठी महापालिकेने जे स्टॉल दिलेले आहेत ते त्यांना ज्या ठिकाणी चांगला व्यवसाय करता येईल त्या ठिकाणी लावू देण्याचे निर्देश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
जनता दरबारात शासकीय यंत्रणांशी संबंधित प्रश्न, महापालिका व नागरी समस्या, पोलीस आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न, प्रकल्पग्रस्तांचे मुद्दे, वनसंपत्ती व पर्यावरण विषयक तक्रारी आदी विषयांवर नागरिकांनी निवेदने सादर केली. एनएमएमटी आणि नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांनी कायम करण्यासाठी नाईक यांना निवेदन दिले असता संबंधित आस्थापनेमध्ये दीर्घकाळ सेवा करणारे कर्मचारी कायम झाले पाहिजेत, असे सांगून या कामी शासकीय स्तरावर कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
ना. गणेश नाईक यांनी एकसंघ ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सलग १० वर्षे जनता दरबार आयोजित केला होता आणि लाखो नागरिकांना न्याय मिळवून दिला होता. १० वर्षांनंतर पुन्हा सुरू झालेल्या या परंपरेत लोकांचा प्रचंड प्रतिसाद दिसून आला.
मंत्री गणेश नाईक यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, "जनतेच्या समस्या सोडवण्यास विलंब होता कामा नये. तात्काळ निर्णय घ्या आणि उर्वरित समस्या कालबद्ध पद्धतीने मार्गी लावा."
जनता दरबारामुळे शासन, प्रशासन आणि नागरिक यांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी मिळाली असून हा उपक्रम जनतेसाठी हक्काचे व्यासपीठ ठरत आहे.