राजू पाटील यांना गावात ६८३ मते; १४४ मतांची आघाडी
डोंबिवली : विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित करत, ‘कल्याण ग्रामीण'चे माजी आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांना त्यांच्या गावी एकही मत मिळाले नसल्याचा दावा केला. मात्र, राज ठाकरे यांच्या या विधानावर आता स्थानिक ‘शिवसेना शिंदे गट'च्या कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिवाद केला आहे. राजू पाटील यांच्या काटई गावातील शिवसैनिकांनी ‘निवडणूक आयोग'च्या फॉर्म नंबर-२० मधील अधिकृत माहिती सोशल मिडीयावर व्हायरल करत, ‘राज ठाकरे यांना चुकीची माहिती कोणी पुरवली?' असा थेट सवाल उपस्थित केला आहे.
‘शिवसेना शिंदे गट'चे पदाधिकारी अर्जुन पाटील यांच्या मते कल्याण ग्रामीण मतदारसंघातील काटई गावात एकूण १,४७० मतदार आहेत. येथे निवडणुकीसाठी ३ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. ‘निवडणूक आयोग'च्या अधिकृत माहितीनुसार, राजू पाटील यांना त्यांच्या गावात मिळालेली मते (मतदान केंद्र क्र.३५३ः राजू पाटील-२६० मते, राजेश मोरे-१८३ मते, मतदान केंद्र क्र.३५४ः राजू पाटील -२६९ मते, राजेश मोरे २०५ मते, मतदान केंद्र क्र.३५५ः राजू पाटील -१५४ मते, राजेश मोरे -१५१ मते एकूण मतेः राजू पाटील -६८३ मते, राजेश मोरे -५३९ मते) ६८३ असून राजू पाटील यांना त्यांच्या गावात १४४ मतांची आघाडी असल्याचा शिवसैनिकांनी केला आहे. त्यामुळे राजू पाटील यांना त्यांच्या गावातून शून्य मते मिळाली, असा राज ठाकरे यांचा दावा चुकीचा ठरतो. दरम्यान, चुकीची माहिती राज ठाकरे यांच्यापर्यंत कोणी आणि का पोहोचवली? यावर आता राजकीय वादंग निर्माण झाले आहे.