नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनची निवडणूक होणार चुरशीची

नवी मुंबई : नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन ची निवडणूक येत्या २ फेब्रुवारी रोजी होत आहे. मात्र असे असले तरीही या निवडणुकीत उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, खजिनदार तसेच दोन महिला सदस्य यांच्या विरोधात कुणीही प्रतिस्पर्धी उभे न राहिल्याने हे पाच उमेदवार निवडणुकी पूर्वीच बिनविरोध विजयी उमेदवार म्हणून घोषित झाले आहेत. आता उर्वरित पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीत दोन जॉईंट सेक्रेटरी आणि पाच सदस्य यांच्यात निवडणूक होत असून या निवडणुकीत जॉईंट सेक्रेटरी या पदासाठी माजी नगरसेवक वैभव गायकवाड व सदस्य पदासाठी माजी नगरसेवक विक्रम उर्फ राजू शिंदे यांनी अपक्ष फॉर्म भरल्याने या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.

१९८१ साली सुरू झालेल्या या क्लबला ४५ वर्षे पूर्ण होत आहेत.  हा क्लब निर्माण करण्यात व आज पर्यंत योग्य रीतीने चालवण्यात डॉ. दिलीप राणे यांचे मोठे योगदान आहे.

शेषराव वानखेडे यांनी नवी मुंबईत भव्य स्टेडियम व क्लब निर्माण व्हावा यासाठी डॉ. दिलीप राणे यांच्या मदतीने वाशी येथे मुंबई स्पोर्ट्स क्लबची स्थापना केली. यावेळी डॉ. दिलीप राणे यांनी नवी मुंबई, मुंबई, रायगड येथील नागरिकांना सदस्य होण्यासाठी फार मेहनत घेतली. डॉ. दिलीप राणे यांच्यामुळेच आज क्लबची खरी भरभराट झालेली आहे. आज या क्लब मध्ये साडे सहा हजार सदस्य आहेत. सुरुवातीला पाचशे रुपयांनी सुरु झालेली सदस्य फी आज २० लाखावर पोहचली आहे.

या क्लबचे विद्यमान उपाध्यक्ष डॉ. दिलीप राणे यांनी माघार घेतल्याने त्यांचे सहकारी असलेले जॉईंट सेक्रेटरी डॉ. फडणीस यांनीही या निवडणुकीतून माघार घेतली आहे. डॉ. दिलीप राणे आणि डॉ. फडणीस यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याने क्लबचे कामकाज यापुढे कसे चालेल ? याची चिंता  क्लबच्या सदस्यांना पडली आहे. आजतागायत डॉ. दिलीप राणे पॅनल या नावाने क्लबच्या निवडणुका लढवल्या गेल्या व त्यात या पॅनलने नेहमीच बाजी मारली आहे. निवडून आलेल्या पॅनलच्या माध्यमातून क्लबचा चेअरमन ठरत असतो. त्यानुसार डॉ. दिलीप राणे यांनी सुरुवातीला स्वर्गीय शेषराव वानखेडे, पतंगराव कदम व मंत्री गणेश नाईक यांना चेअरमनपदी बसवले. 

2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत दोन माजी नगरसेवक निवडणूक लढवत असल्याने सत्ताधारी गट या निवडणुकीत धोका होऊ नये म्हणून पुन्हा डॉ. दिलीप राणे पॅनल या नावाने निवडणूक लढवीत आहेत.

जॉईंट सेक्रेटरी पदासाठी निवडणूक रिंगणात असलेले माजी नगरसेवक वैभव गायकवाड, व सदस्य पदासाठी माजी नगरसेवक विक्रम उर्फ राजू शिंदे यांच्यामुळे निवडणुकीत रंगत निर्माण झाली असून या दोघांचं पारड जड असल्याची चर्चा आहे. जॉईंट सेक्रेटरी पदासाठी डॉ. राणे पॅनल कडून दिनेश कनानी व दत्तू पाटील हे निवडणूक लढवित असून त्यांच्या विरोधात माजी नगरसेवक वैभव गायकवाड व मेघनाथ भगतअसा सामना होणार आहे.तर सदस्य पदासाठी एडवोकेट निलेश भोजने, डॉ. कंवरसिंग पनवर, राजेंद्र पानसरे, अशोक पाटील, प्रकाश श्रीनिवासन, विक्रम शिंदे, कीर्ती राणा, प्रताप शिवाजी भोसकर हे निवडणूक रिंगणात आहेत.यातील पाच सदस्य निवडले जातील.

बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये उपाध्यक्ष विजय एस पाटील, जनरल सेक्रेटरी विजयआर.पाटील तर खजिनदार म्हणून संजय निकम तसेच महिला सदस्य कविता गांगुली, शिल्पा केनिया यांचा समावेश आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील कामांची आ. प्रशांत ठाकूर यांच्याद्वारे पाहणी