खाजगी विकासकाचा खेळाचे मैदान गिळंकृत करण्याचा डाव
नवी मुंबई : टीपीव्ही विश्वकर्मा व्हेंचर्स एलएलपी या विकासकाद्वारे नेरूळ, सेक्टर-२४ येथील भूखंड क्रं,४,५ येथे पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येत असून या विकासकाकडून संबंधित भूखंडास लागून असलेल्या भूखंड क्र.७ या महापालिकेच्या मोकळ्या मैदानाच्या भूखंडावर अनधिकृतपणे खोदकाम सुरु असून यावेळी मध्ये असलेली संरक्षक भिंत पाडण्यात आलेली आहे. टीपीव्ही विश्वकर्मा व्हेंचर्स या बांधकाम विकासकाने बांधकाम प्रारुप प्रमाणातपत्र प्राप्त करताना आवश्यक असलेल्या नियम आणि अटी-शर्तींचा भंग केला असल्यामुळे भूखंड क्रमांक ४,५, सेक्टर २४ नेरूळ याभूखंडासाठी देण्यात आलेले बांधकाम प्रारुप प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे. तसेच सदर ठिकाणचेे बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे, अशी मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'चे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका नगररचना विभागाकडे केली आहे.
या भूखंडाचा मैदान म्हणून लहान मुलांकडून खेळण्यासाठी वापर केला जातो आणि या मैदानात अनधिकृतपणे उत्खनन केल्यामुळे आणि संरक्षक भिंत पाडून टाकल्यामुळे सदर ठिकाणी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे टीपीव्ही व्हेंचर्सला दिलेली सीसी रद्द करण्यात यावी. अन्यथा या गंभीर प्रकाराविरोधात नगरचनाकारांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखील सविनय म्हात्रे यांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकरणात महापालिका अधिकाऱ्यांचे बिल्डरला अभय असून बिल्डरकडून खेळाचे मैदान गिळंकृत करण्याचा डाव असल्याचा आरोपही सविनय म्हात्रे यांनी केला आहे.