पिल्लई कॉलेजवर ‘मनसे'ची धडक

नवीन पनवेल : नवीन पनवेल मधील पिल्लई कॉलेजवर ‘मनसेे'तर्फे मोर्चा नेण्यात आला. पिल्लई कॉलेज मध्ये दरवर्षी होणाऱ्या ॲलेग्रिया या कार्यक्रमासाठी ‘मनसे'ने आक्षेप नोंदवला आहे.

‘मनसे'चे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांच्या सुचनेवरून मनसैनिक पिल्लई महाविद्यालयाच्या ॲलेग्रिया या वार्षिक महोत्सवास विरोध करण्यासाठी महाविद्यालयावर धडकले. अश्लिलतेला प्रोत्साहन देणारा, महाराष्ट्रातील संस्कृतीचा अपमान करणारा आणि बिभत्सतेने भरलेला ॲलेग्रिया आम्ही होऊ देणार नाही, अशी भूमिका ‘मनसे'ने घेतलेली आहे. याबाबतचे सूचना पत्र ‘मनसे'च्या शिष्टमंडळाने महाविद्यालयाला दिले आहे.

महोत्सव दरम्यान चालणारे सर्व कार्यक्रम तरुण पिढीला बरबाद करणारे असल्याचा आरोप ‘मनसे'ने केला आहे. तसेच महाविद्यालयाचे काम विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देण्याचे त्यांच्या अभ्यासक्रमावर भर देण्याचे आहे. मात्र, महाविद्यालयात जे कार्यक्रम होत आहे, त्यामुळे जर तरुण पिढी बरबाद होणार असेल तर असे कार्यक्रम होऊ देणार नसल्याचे ‘मनसे'चे म्हणणे आहे. त्यामुळे पिल्लई महाविद्यालयातील कार्यक्रमाचे स्वरुप बदलले नाही तर सदरचा कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा ‘मनसे'ने पत्राद्वारे दिला आहे. त्यामुळे पिल्लई कॉलेजचा ॲलेग्रिया महोत्सव यंदाच्या वर्षी रद्द होतो की काय? अशी चर्चा रंगली आहे. याबाबत पिल्लई महाविद्यालय प्रशासनासोबत संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

खाजगी विकासकाचा खेळाचे मैदान गिळंकृत करण्याचा डाव