नेरुळ-जुईनगर मधील नागरी समस्या सोडवा; अन्यथा दालनात ठिय्या आंदोलन
नेरुळ : नेरुळ, जुईनगर विभागातील नागरी समस्यांबाबत ‘मनसे'चे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, सहसचिव अभिजीत देसाई यांच्या नेतृत्वाखाली नेरुळ विभाग अधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. यावेळी ‘मनसे'च्या शिष्टमंडळाने प्रभागातील समस्यांचा पाढा विभाग अधिकारी जावडेकर यांच्यासमोर वाचून दाखविला. तसेच येत्या सात दिवसात नागरी समस्या न सोडविल्यास विभाग अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी ‘मनसे'तर्फे देण्यात आला.
नेरुळ रेल्वे स्थानक पूर्व, नेरूळ रेल्वे स्थानक पश्चिम ते गुडविल सोसायटी येथील रस्त्यांवर, पदपथांवर अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत फळविक्रेते यांनी उच्छाद मांडला असून रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. याठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याची गरज आहे. तसेच बर्ड पलूचा धोका लक्षात घेता मानक हॉस्पिटल ते साईबाबा हॉटेल येथील मागच्या बाजुस असणाऱ्या सर्व्हिस रोडवर कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या गाड्या अनधिकृत पार्क केल्या जात असल्याने या वाहनांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी ‘मनसे'च्या वतीने यावेळी करण्यात आली.
सायन-पनवेल महामार्गावर एलपी उड्डाणपुलाखालील बंद असलेल्या भुयारी मार्गात पाणी आणि कचरा साचल्याने दुर्गंधी पसरत असल्याची तक्रार यावेळी विभाग अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. सेक्टर-१९ गुरुद्वारामागील मोठ्या नाल्यात गाळ आणि कचरा साठल्याने मलेरिया, डेंगू रोगाची साथ पसरु शकते.
प्रभागात जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून त्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी यावेळी ‘मनसे'तर्फे करण्यात आली. तसेच जुईनगर, नेरुळ विभागात काही ठिकाणी स्पीड ब्रेकर उभारणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, उद्यानांच्या वेळेत वाढ करणे, आदि मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
याप्रसंगी ‘मनसे'च्या शिष्टमंडळात उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, सहसचिव अभिजित देसाई यांच्यासह विभाग अध्यक्ष अनिकेत भोपी, अक्षय भोसले, निखील गावडे, उमेश गायकवाड, प्रवीण राऊत, अक्षय कदम, प्रणित डोंगरे, जितेंद्र भोईर, दिनेश सेन, नितीन मराठे, विनायक पाटील, अमोल सरडे, आदि पदाधिकारी उपस्थित होते.