उल्हासनगर मधील प्रलंबित विकासकामे तातडीने सुरु करण्याची मागणी
उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील अनेक विकासकामे प्रलंबित असून ती तातडीने सुरु करण्यात यावी. तसेच ‘रेल्वे'च्या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनच्या कामात विस्थापित होणाऱ्या शहाड परिसरातील रहिवासी आणि दुकादारांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर यांनी केली आहे. यासंदर्भात भुल्लर यांच्यासह ‘शिवसेना'च्या शिष्टमंडळाने नवनियुक्त आयुक्त मनीषा आव्हाळे यांची २१ जानेवारी रोजी भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे.
उल्हासनगर शहरातील रस्ते, पाणी पुरवठा योजना, उद्याने, बगीचा विकसित करणे, आरोग्य सेवा तसेच अन्य विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने अनेक विकास कामे प्रलंबित असून सदर विकासकामे तातडीने सुरु करण्यात यावी. तसेच कल्याण-कसारा रेल्वे लाईनच्या कामामध्ये शहाड परिसरातील जवळपास १५० रहिवासी आणि दुकानदार यांचे उल्हासनगर शहरातच पुनर्वसन व्हावे आणि त्यांना योग्य तो मोबदला मिळावा या मागणी विषयी राजेंद्र सिंह भुल्लर यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी आपण व्यवतीशः लक्ष घालून सदर विकास कामे लवकरात लवकर सुरु करु, असे आश्वासन आयुक्त आव्हाळे यांनी दिल्याची माहिती भुल्लर यांनी दिली आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ शिवसेना पदाधिकारी तिरुपती रेड्डी, माजी नगरसेवक जाफर अली चौधरी, शिवसेना उपशहर प्रमुख जितू उपाध्याय, विभागप्रमुख प्रमोद पांडेय, विनोद सालेकर, राजू साळवी, रामकृपाल यादव, श्रीराम कुंभार, सुमीत सिंग, राय साहेब यादव,रिंकू शर्मा, विशाल आंबेकर, सतीश पांडेय,समाजसेवक साबीर शेख, विजय ओझा, राकेश यादव आणि अन्य पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते.