नवी मुंबईत १६ वाहतूक शाखांकडून बिगर सीटबेल्ट अन्वये कारवाई

वाहन चालकांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे - पोलीस उपआयुक्त काकडे

नवी मुंबई : नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या वाहन चालकांवर विशेष मोहिमेद्वारे कारवाई केली. संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राबविण्यात आलेल्या या कारवाईत सीट बेल्ट न लावणाऱ्या ९०५ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.  

नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात धडक मोहीम हाती घेऊन त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. नवी मुंबई पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते २ या कालावधीत संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या वाहन चालकांवर विशेष मोहिमेद्वारे कारवाई केली. या विशेष मोहिमेदरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील १६ वाहतूक शाखांकडून एकूण ९०५ वाहन चालकांवर बिगर सीटबेल्ट अन्वये कारवाई करण्यात आली.

दरम्यान, यापुढील काळात देखील वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात येणार असून वाहन चालकांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी केले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

17 दिवसाच्या बाळाला अडीच लाख रुपयांमध्ये विकण्याचा प्रयत्न