जेएनपीटी भागात ट्रेलर मधील डिझेल चोरणा-या टोळीतील दुक्कली जेरबंद  

जेएनपीटी परिसरात डिझेल चोरांचा सुळसुळाट  

नवी मुंबई : जेएनपीटी भागात रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रेलरमध्ये डिझेलची चोरी करणाऱया टोळीतील दोघांना ट्रेलर चालकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना गुरुवारी पहाटे जेएनपीटीतील प्री-गेट कडुन पीयुबी सिग्नलकडे जाणाऱ्या रोडवर घडली. कमल चंद्रपाल राठोड (30) व उमेश सुरेश भिसे (20) अशी डिझेल चोरांची नावे असून या दोघांना ट्रेलर चालकांनी चोप देखील दिला आहे. न्हावा शेवा पोलिसांनी या दोन्ही डिझेल चोरांना अटक करुन त्यांनी चोरलेले 35 लिटर डिझेल व त्यांची कार जफ्त केली आहे.  


या प्रकरणात अटक करण्यात आलेले कमल राठोड आणि उमेश भिसे हे दोघेही कोपरखैरणेत राहण्यास असुन गुरुवारी पहाटे ते मारुती सियाझ कारमधुन तर त्याचे इतर तिघे साथिदार दुस-या वाहनातून डिझेल चोरी करण्यासाठी जेएनपीटी भागात गेले होते.   हि टोळी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास प्री-गेट कडुन पीयुबी सिग्नलकडे जाणाऱया रोडवर इंडियन ऑईल कंपनीसमोरील रोडवर पार्क असलेल्या ट्रेलरमधील डिझेलची चोरी करत असताना ट्रेलर चालकांना त्यांची चाहुल लागली. त्यांनतर ट्रेलर चालकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही वाहनातील डिझेल चोरांनी त्याठिकाणावरुन पळ काढला. त्यामुळे ट्रेलर चालकांनी सियाज कारचा पाठलाग करुन कमल राठोड आणि उमेश भिसे या दोघांना पकडून चोप दिला. त्यांनतर दोघांना न्हावाशेवा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करुन त्यांनी चोरलेले सुमारे 35 लिटर डिझेल व सियाझ कार हस्तगत केली आहे.

 
जेएनपीटी परिसरात डिझेल चोरांचा सुळसुळाट  
जेएनपीटी भागात मोठ्या प्रमाणात कंटेनर ट्रेलरची वाहतुक असल्याने या भागात डिझेल चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे या भागातील ट्रान्सपेर्ट चालक तसेच परराज्यातून वाहने घेऊन येणारे चालक त्रस्त झाले आहेत. हे डिझेल चोर मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यालगत पार्क असलेल्या ट्रेलरच्या डिझेल टाकीला असलेले टाळे तोडून मोटरद्वारे त्यातील डिझेल काही मिनीटात आपल्या जवळच्या टाकीत भरुन पळुन जात असल्याचे या भागातील एका चालकाने सांगितले. त्याचप्रमाणे हे डिझेल चोर ट्रेलर चालकाला हत्याराचा धाक दाखवून त्यांच्या ट्रेलरची डिझेलची टाकी काही मिनीटात रिकामी करुन पळून जात असल्याचे वाहन चालक सांगतात. त्यामुळे या डिझेल चोरांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी या भागातील ट्रेलर चालक व ट्रान्स्पोर्ट मालकांकडून करण्यात येत आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 वाहन जळीत प्रकरणी पोलीस उपायुक्तांनी मागविला अहवाल