वाहन जळीत प्रकरणी पोलीस उपायुक्तांनी मागविला अहवाल

सचिन ठाकूर यांनी घेतली पोलीस उपायुवत डहाणे यांची भेट

पनवेल : उरण पंचक्रोशीतील सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते सचिन ठाकूर यांच्या गाडीचा स्फोट घडवून आणण्याच्या कटकारस्थानातून सात महिन्यात दोन वेळा वाहन जळीतकांड घडवण्यात आले. मात्र, न्हावा-शेवा पोलीस आरोपींना पाठिशी घालत असल्याने कारवाई होऊ शकली नाही. या प्रकरणी परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी कारवाईचा अहवाल मागविल्याने सदर प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उरण तालुक्यातील जसखार गांव येथे राहणारे आई तुझं देऊळ फेम सचिन ठाकूर यांच्या गाडीला जानेवारी आणि आता ऑगस्ट  महिन्यात अशी दोन वेळा अज्ञात समाजकंटकांनी आग लावली. सदरचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असूनही न्हावा-शेवा पोलीस आरोपींना अटक करु शकलेले नाहीत, याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.

या संदर्भात ११ ऑगस्ट रोजी सचिन ठाकूर आणि रुद्र डान्स अकादमीचे संचालक पपन पाटील यांनी सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांची भेट घेवून कारला लावलेल्या आगीची घटना विषद केली. यानंतर कांतीलाल कोळी यांनी तात्काळ परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे आणि न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधून त्यांना सदर घटनेकडे गांभिर्याने पाहण्याची विनंती केली. त्यानंतर ठाकूर आणि पाटील यांनी पोलीस उपायुवत डहाणे यांची भेट घेतली. गाडी जाळून सीएनजी सिलेंडरचा स्फोट घडवून शेजारी असलेले माझे घर उडवून देण्याचा कट होता. तरीही पोलीस थातुरमातूर गुन्हा दाखल करुन आरोपींना मोकाट सोडत असतील तर जगणे अवघड होऊन जाईल, अशा शब्दात सचिन ठाकूर यांनी उपायुवत डहाणे यांच्याकडे व्यथा मांडली. त्यावर उपायुक्त डहाणे तात्काळ संबंधितांकडे गुन्ह्यासह केलेल्या कारवाईचा अहवाल मागविला आहे.

सात महिन्यात दोन वेळा वाहन जळीतकांड घडूनही न्हावा-शेवा पोलीस आरोपींवर कारवाई करणार नसतील तर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू. याशिवाय वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ आणि हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आम्ही वरिष्ठांकडे किंवा गृहमंत्र्यांकडे दाद मागू. -कांतीलाल कडू, अध्यक्ष-पनवेल संघर्ष समिती.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नेरुळमधील क्लिनिकमध्ये काम करणा-या महिलेचा संशयास्पद मृत्यू