कोपरी गावात पावणे तीन लाखांची घरफोडी  

डाळी व धान्यांचे डबे रिकामे करत चोरटयानी सोन्यांच्या दागिन्यांवर मारला डल्ला  

नवी मुंबई : वाशीतील कोपरी गावात अज्ञात चोरटयानी घरफोडी करुन सुमारे पावणे तीन लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे चोरटयानी दागिने आणि रोख रक्कमेची शोधाशोध करताना डाळींचे व धान्यांचे डबे रिकामे केल्याचे तसेच सोन्याच्या बनावट दागिन्यांना हात स्द्धा लावला नसल्याचे आढळुन आले आहे. एपीएमसी पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरटया विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

कोपरी गावात ठाकूर आळीत देविदास भोईर आपल्या कुटुंबासह राहण्यास आहेत. गत 28 जुलै रोजी ते नेहमी प्रमाणे कामावर गेले तर त्यांची पत्नी उलवे येथे गेल्या होत्या. त्यानंतर देविदास देखील कामावरुन उलवे येथे गेल्याने ते सर्वजण रात्री तेथेच थांबले. यादरम्यान, देविदास भोईर यांचे घर बंद असल्याची संधी साधुन चोरटयानी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व लॅपटॉप असा एकूण 2 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. 30 जुलै रोजी दुपारी 3 च्या सुमारास घरकाम करणारी महिला देविदास भोईर यांच्या घरी गेली असता, तिला त्यांच्या घराचा कडी कोयंडा तुटल्याचे व दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले.  

याबाबतची माहिती सदर महिलेने देविदास भोईर यांना फोनवरुन दिल्यानंतर त्यांनी कोपरी येथील घरी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी घरातील वस्तूंची पाहणी केली असता त्यांच्या घरातील दागिने व लॅपटॉप असा एकूण 2 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरटयानी डाळी आणि धान्यांच्या डब्यातही दागिने व रोख रक्कमेची शोधाशोध केल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे या चोरटयानी घरातील कपाटात असलेल्या बनावट सोन्याच्या दागिन्यांना हात देखील लावला नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर देविदास भोईर यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नेरुळ गाव सेक्टर-20 मधील सदगुरु अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी