नवी मुंबई आरटीओकडुन खाजगी प्रवासी बसेसवर कारवाई  

विशेष मोहिमेद्वारे नवी मुंबई आरटीओकडुन 78 खाजगी प्रवासी बसेसवर कारवाई  

नवी मुंबई : समृद्धी महामार्गावर खाजगी प्रवासी बसेसला झालेल्या अपघातानंतर राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांमार्फत खाजगी बसेसची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने देखील आपल्या हद्दीत विशेष मोहिमेद्वारे खाजगी बसेची तपासणी करुन परवान्याच्या अटींचा भंग करणाऱया तसेच इतर नियमभंग करणाऱया 78 खाजगी प्रवासी बसेसवर कारवाई करुन त्यांच्याकडुन 7 लाख 42 हजार 750 रुपयांचा दंड वसूल केला आहे.  

काही खाजगी प्रवासी बस चालकांकडुन विना परवाना, फिटनेस, इन्शुरन्स व पीयूसी नसताना नियमबाह्यपणे बसेस चालविण्यात येते. तसेच खासगी बसेस या प्रवासी वाहतुकीसाठी असताना त्यांचा वापर प्रवासी वाहतुकीबरोबर बेकायदेशीररीत्या मालवाहतुकीसाठी करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याशिवाय अनेक खाजगी बस चालक क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करत असल्याचे आढळुन आले आहे. नुकतेच समृद्धी महामार्गावर तसेच इतर ठिकाणी खाजगी प्रवासी बेसेसच्या अपघातात वाढ होत असल्याने राज्याच्या परिवहन विभागाकडुन खाजगी प्रवासी बसेसची झाडाझडती घेण्यात येत आहे. या तपासणीत दोषी असलेल्या बसेसवर कारवाई करण्यात येत आहे.

 नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाकडुन देखील खाजगी प्रवासी बसेसची विशेष मोहिमेद्वारे तपासणी करण्यात आली. या तपासणी माहिमेमध्ये बसेसची तपासणी करतांना विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे, टफ्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र वैध नसणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर इत्यादींमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर भरल्याची खात्री करणे, जादा भाडे आकारणे, अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे, आपत्कालीन परिस्थितीत निर्गमन द्वार आणि इतर दरवाजे कार्यरत स्थितीत आहेत काय आदी बाबींची तपासणी करण्यात आली. त्यानंतर विविध गुह्यांमध्ये दोषी आढळलेल्या 78 बसेसवर कारवाई करण्यात आली.  - हेमांगीनी पाटील (उप प्रादेशिक परिवहन अधिकारी-नवी मुंबई)

वाहन कर न भरणारे, आपत्कालीन दरवाजा कार्यरत स्थितीत नसणारे, अवैधरित्या व्यवसायिक पद्धतीने माल वाहतुक करणारे, आसन क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतुक करणारे, वेग नियंत्रक बसविणे व ते कार्यरत असणे आवश्यक असतांना वेग नियंत्रक नसणारे, जादा भाडे आकारणी करणारे आदी बाबींची विशेष तपासणी मोहिमेत खाजगी बसेसवर नवी मुंबई उप प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा या दृष्टीकोनातून हि विशेष मोहिम राबविण्यात आली.  

 

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या इमारतीला तडे