शिरढोण येथे एसटी-खाजगी बसची समोरासमोर धडक

 मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बस आणि खाजगी बसची समोरासमोर टक्कर
 

नवी मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल येथील पळस्पे भागात अपघाताचे सत्र सुरुच असून २९ जून रोजी सकाळी या ठिकाणी एसटी बस आणि खाजगी बसचीसमोरासमोर टक्कर झाल्याची घटना घडली. यात दोन्ही बसचे चालक आणि एक महिला प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघातात दोन्ही बसचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. पनवेल शहर पोलिसांनी या अपघाताची नोंद करुन पुढील कार्यवाही सुरु केली आहे.

या अपघातातील एसटी बस २९ जून रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास पनवेल येथून पेणच्या दिशेने जात होती. तर जेएसडब्ल्युची खाजगी बस पनवेलच्या दिशेने येत होती. या दोन्ही बस मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे येथील शिरढोण गावाजवळ असलेल्या उड्डाणपुलावर आल्या असताना त्यांची समोरासमोर टक्कर झाली. यात एसटी बसचा चालक संतोष म्हात्रे आणि जेएसडब्ल्यु बसचा चालक संजय म्हात्रे असे दोघेजण त्याचप्रमाणे एसटी बसमधील एक महिला गंभीररित्या जखमी झाले.

सदर अपघाताची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या अपघातात जखमी झालेल्या तिघांना एमजीएम हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल केले आहे. या अपघातात दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पनवेल शहर पोलिसांकडून या अपघाताचा अधिक तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे येथे आठवड्याभरामध्ये झालेली अपघाताची सदरची तिसरी घटना असून काही दिवसांपूर्वी झालेल्या दोन अपघातांमध्ये तिघांचा बळी गेला आहे. तर २९ जून रोजी झालेल्या तिसऱ्या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल भागामध्ये अपघातात वाढ होत असल्याने वाहन चालकांनी वेग मर्यादेचे आणि वाहतूक नियमांचे पालन करुन वाहने चालवावीत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाहतूक पोलिसांनी आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा जीव वाचवला