वाहतूक पोलिसांनी आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा जीव वाचवला

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा वाहतूक पोलिसांनी वाचवला जीव  

नवी मुंबई : कौटुंबिक वादातून पत्नीसोबत भांडण झाल्याने रागाच्या भरात रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय तरुणाला वाचविण्याची कामगिरी तळोजा वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई अनिल खैरे आणि पोलीस हवालदार आदिनाथ आघाव यांनी केले आहे. २ जून रोजी सायंकाळी तळोजा येथील पेंधर फाट्याजवळ सदर घटना घडली.

या घटनेतील २८ वर्षीय तरुण तळोजा फेज-२ भागात पत्नीसह राहण्यास असून २९जून रोजी दुपारी त्याचे पत्नी सोबत भांडण झाले होते. या भांडणामुळे त्याची पत्नी मोबाईल फोन बंद करुन घर सोडून निघून गेल्याने सदर तरुण रागाच्या भरात सायंकाळी ६ च्या सुमारास तळोजा येथील पेंधर रेल्वे फाटकाजवळ रेल्वे खाली जीव देण्यासाठी गेला होता. यावेळी तो पेंधर फाट्यापासून ५० मीटर अंतरावर रेल्वे रुळालगत घुटमळत असल्याचे पेंधर रेल्वे फाटक येथील गेटमनच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ सदर ठिकाणी वाहतूक नियमन करत असलेले तळोजा वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार आदिनाथ आघाव आणि पोलीस शिपाई अनिल खैरे यांना हाक देऊन मदतीसाठी बोलावून घेतले. त्यानंतर गेटमनने रेल्वे रुळालगत आत्महत्या करण्यासाठी उभ्या असलेल्या व्यक्तीची पोलिसांना माहिती दिली. यावेळी पोलीस शिपाई अनिल खैरे यांनी क्षणाचाही विलंब न करता, दोन्ही रेल्वे रुळावरुन रेल्वे गाड्या क्रॉसिंग होत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून सदर तरुणाला रेल्वे रुळापासून बाजुला केले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता, पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून आत्महत्या करण्यासाठी आल्याचे सांगितले. पोलीस हवालदार आदिनाथ आघाव आणि पोलीस शिपाई अनिल खैरे यांनी त्याला समजावून त्याला आत्महत्येपासून परावृत्त करत घरी पाठवून दिले.  

पोलीस शिपाई अनिल खैरे आणि पोलीस हवालदार आदिनाथ आघाव यांनी आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा जीव वाचविल्यामुळे तेथे जमलेल्या नागरिकांनी तसेच वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कदम यांनी त्यांचे अभिनंदन करत कौतुक केले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

‘रिलायन्स जिओ'मध्ये नोकरीचे आमिष; बेरोजगारांची फसवणूक