महापालिका कार्यक्षेत्रात पथपदांवरती उभी असलेली दुचाकी, चारचाकी  बेवारस वाहनांवरती कारवाई

महापालिका कार्यक्षेत्रातील बेवारस वाहनांवर कारवाईस सुरूवात

पनवेल:  महापालिका कार्यक्षेत्रात पथपदांवरती उभी असलेली नादुरूस्तीची, भंगार व पडीक दुचाकी, चारचाकी  बेवारस वाहनांवरती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनूसार महानगरपालिकेच्यावतीने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. 

सदर कामासाठी महापालिकेने ठेकेदाराची नेमणूक केली आहे. महापालिका हद्दतील चारही प्रभागांमधील सार्वजनिक रस्त्यांवरील बेवारस वाहनांचे सर्वेक्षण करण्यात आले असून या वाहनांवरती सात दिवसांची नोटीस चिकटविण्यात येत आहे. सात दिवसांमध्ये संबधित वाहन मालकाने वाहन न नेल्यास, वाहनांचे टोईंग करून महापालिकेने निश्चित केलेल्या यार्डमध्ये वाहन नेले जाईल.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहकार्याने सदर वाहन मालकाचा शोध घेऊन , वाहन मालकास वाहन घेऊन जाण्यासाठी 45 दिवसांची नोटिस देण्यात येईल. या दरम्यान वाहन मालक वाहन घेऊन जाण्यास उपस्थित झाल्यास त्यास महापालिकेने  वाहनाच्या प्रकारानूसार निश्चित केलेल्या  दंड रकमेचा भरणा केल्यानंतर संबधित वाहन मालकास  वाहन सुपूर्त करण्यात येईल. 45 दिवसात जर वाहन मालकाने वाहन नेले नाही तर पुन्हा एकदा सात दिवसाची नोटीस  देण्यात येईल. या नोटीसीची दखल वाहन मालकाने  न घेतल्यास सदर वाहनाचे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मुल्यांकन करण्यात येईल. त्यानंतर सदर वाहनांचा लिलाव महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे, अशी  माहिती  उपायुक्त कैलास गावडे यांनी दिली आहे.

पनवेल महानगरपालिकेने आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणानूसार पालिका हद्दीत सार्वजनिक रस्त्यांवरील  सुमारे 345  बेवारस वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये दुचाकी, रिक्षा, कार, टेम्पो, ट्रक, जड वाहने, बस  यांचा समावेश आहे. प्रभाग कार्यालयामार्फत वाहनांवरती नोटीसा चिटकविण्यात येतआहेत. आतापर्यंत सुमारे 10 वाहनांवरती  वाहने स्थलांतरणाची कारवाई करण्यात आली आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे जनजागृती