हत्येच्या दिवशी अश्विनी बिद्र, कुरुंदकर यांचे मोबाईल टॉवर लोकेशन, जीपीआरएस लोकेशन एकच
अश्विनी बिंद्रे हत्याकांड :
नवी मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येच्या दिवशी ११ एप्रिल २०१६ रोजी सायंकाळी ठाणे रेल्वे स्टेशन येथून कुरुंदकर राहत असलेल्या भाईंदर येथील घरापर्यंत रात्री अश्विनीचा मोबाईल बंद होईपर्यंत अश्विनी बिद्रे आणि अभय कुरुंदकर या दोघांचे मोबाईल टॉवर लोकेशन, जीपीआरएस लोकेशन एकच होते, अशी साक्ष अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा तपास करणारे ‘पनवेल'चे तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी न्यायालयात दिली. त्यामुळे अश्विनी बिद्रे यांच्या हत्येच्या दिवसाचे कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे या दोघांच्या मोबाईल टॉवर लोकेशन, जीपीआरएस लोकेशनवर शिक्कामोर्तब झाले आहे.
अश्विनी बिद्रे हत्याकांडची सुनावणी पनवेल सत्र न्यायालयात न्या. पालदेवार यांच्या न्यायालयात सुरु असून १७ जून पासून तत्कालीन तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांची साक्ष सुरु झाली आहे. ११ एप्रिल २०१६ रोजी संध्याकाळी ६.४१ वाजता अभय कुरुंदकर याने अश्विनी बिद्रे हिला ठाणे पूर्व येथील शिवम हॉटेल येथे भेटून तिचे बरेवाईट करण्याच्या हेतुने तिला सोबत भाईंदर (पूर्व) येथे नेले होते. त्यानंतर कुरुंदकर याने अश्विनीचा मोबाईल आपल्या सोबत ठेवून १३ आणि १४ एप्रिल २०१६ रोजी नातेवाईक अविनाश गंगापुरे आणि कार्यालय प्रमुख प्रमोदकुमार शेवाळे यांना बनावट एसएमएस पाठविला होता.
त्यामुळे जानेवारीत गुन्हा दाखल केला होता. त्यावेळेस कुरुंदकरच्या मोबाईलचे लोकेशन पोलीस अधीक्षक कार्यालय होते तर अश्विनी बिद्रे यांचे लोकेशन्स खारकर गल्लीच्या मागे म्हणजे दोन्ही मोबाईल टॉवर लोकेशन्स एकच असल्याचे प्रकाश निलेवाड यांनी सांगितले. ११ एप्रिल रोजी कुरुंदकर आणि मृत एपीआय अश्विनी बिंद्रे या दोघांचे मोबाईल टॉवर लोकेशन्स, जीपीआरएस लोकेशन्स ठाणे रेल्वे स्टेशन येथून १८.४५ पासून ते कुरुंदकर रहात असलेल्या भाईंदर मुकुंद प्लाझा येथील घरापर्यंत अश्विनी यांचा मोबाईल बंद होईपर्यंत रात्री २३.११ यादरम्यान एकच होते. याबाबत देखील निलेवाड यांनी न्यायालयात ठामपणे सांगितले.
अश्विनी बिद्रे यांच्या मोबाईल वरुन १४ एप्रिल २०१६ रोजी बनावट एसएमएस गंगापुरेला पाठविण्यात आला होता. त्यावेळेस देखील कुरुंदकरचे लोकेशन्स आणि अश्विनीच्या मोबाईलचे लोकेशन्स एकाच ठिकाणी म्हणजे सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या जवळपास होते. यावरुन अश्विनीचा मोबाईल सुध्दा कुरुंदकरच्या सोबत होता. त्यामुळे कुरुंदकर याने बनावट एसएमएस पाठविला होता, यावर देखील तपासी अधिकारी प्रकाश निलेवाड यांनी ठामपणे सांगितले. प्रकाश निलेवाड यांची उर्वरित साक्ष येत्या २३ जून रोजी होणाऱ्या सुनावणीत होणार आहे.
पनवेल सत्र न्यायालयात न्या.पालदेवार यांच्या न्यायालयात १६ जून रोजी ‘कळंबोली पोलीस ठाणे'चे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी पोपेरे यांची उलटतपासणी पूर्ण झाली. यामध्ये अश्विनी बिद्रे यांच्या मिसिंगचा गुन्हा ते खुनाच्या उद्देशाने झालेला अपहरणाचा गुन्हा दाखल होईपर्यंतचा पूर्ण तपास पोपेरे यांनी केला होता. यामध्ये अश्विनी बिद्रे यांच्या मोबाईलवरुन आलेल्या विपश्यनेला जाणार या एसएमएसच्या आधारे पोपेरे यांनी रेल्वे आरक्षण मधील अश्विनी नामक अन्य दोन महिलांचा शोध घेऊन त्या अश्विनी बिद्रे नसल्याबाबतचा तपास केला होता. १६ जून रोजी पोपेरे यांची उलटतपासणी पूर्ण झाली.