सायन पनवेल मार्गावर बर्निंग कार

सायन पनवेल मार्गावर कार पुर्णपणे जळुन खाक

नवी मुंबई : महालक्ष्मी येथून खारघर येथे प्रवाशी घेऊन जाणा-या उबर कारने अचानक पेट घेतल्याने सदरची कार पुर्णपणे जळुन खाक झाल्याची घटना बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास सायन पनवेल मार्गावर वाशी गाव येथे घडली. कार चालकाने व कार मधील दोन प्रवाशाने सुदैवाने वेळीच बाहेर पळ काढल्याने ते यातून बचावले. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन कारला लागलेली आग काही वेळात विझवली. मात्र तोपर्यंत सदर कार पुर्णपणे जळाली.   

उलवे येथे राहणारा कार चालक खाजा मोइद्दिन शाहुल दिवाण शेख (46) याची हुंडाई एसेंट कार असून तो उबर च्या माध्यमातून आपली कार चालवतो. बुधवारी रात्री खाजा मोइद्दिन याला महालक्ष्मी येथून खारघर येथे जाण्यासाठी प्रवाशी भाडे मिळाले होते. त्यानुसार खाजा मोइद्दिन हा दोन प्रवासी घेऊन खारघर येथे जात होता. रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास त्याची कार सायन पनवेल मार्गावर वाशी गाव येथे आली असताना, कारच्या बोनेट मधून धूर येत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. कार चालकाने व दोन प्रवाशांनी तत्काळ कारमधुन बाहेर पळ काढल्यानंतर कारने पेट घेतला. कार चालक व दोन प्रवाशांनी वेळीच कारमधुन बाहेर पडल्याने ते यातुन बचावले. या घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.  

अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच कारला लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कार पुर्णपणे जळुन खाक झाली. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी कारला लागलेली आग विझवल्यानंतर पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू केली. वाशी पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

महापालिका कार्यक्षेत्रात पथपदांवरती उभी असलेली दुचाकी, चारचाकी  बेवारस वाहनांवरती कारवाई