२ दिवसात ६० दुचाकीस्वारांवर कारवाई

विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ‘आरटीओ'चा दणका

वाशी : नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) नवी मुंबई शहरातील खासगी कंपन्या, शासकीय कार्यालये, महाविद्यालयांतील दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती बाबत १९४ डी अंतर्गत नोटीस बजावली होती. नवी मुंबई शहरातील १९२ कंपन्यांना ‘आरटीओ'ने हेल्मेट सक्ती बाबत नोटीस बजावली असून, ‘आरटीओ'ने आता विना हेल्मेट कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन दिवसात ‘आरटीओ'द्वारे विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या ६० चालकांवर कारवाई करण्यात आली असून, प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. याशिवाय काही दुचाकीस्वारांचा वाहन परवाना निलंबित करण्यात आला आहे, अशी माहिती आरटीओ विभाग द्वारे देण्यात आली आहे.

नवी मुंबई शहरात झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. त्याच धर्तीवर वाहने देखील वाढत आहेत. मात्र, या वाढत्या वाहनांबरोबर नवी मुंबई शहरात वाहतुकीच नियम तोडणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. दिवसेंदिवस राज्यात वाहन अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातील बहुतांश अपघात दुचाकीचे असून, या अपघातात विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांचे प्रमाण जास्त आहे. दुचाकी अपघातात मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. हेल्मेट सक्ती बाबत नवी मुंबई आरटीओ विभागाने खासगी कंपन्या, शासकीय कार्यालये, महाविद्यालय यांना नोटीस बजावून जनजागृती केली होती. त्यानंतर आता गेल्या दोन दिवसांपासून ‘आरटीओ'ने खासगी, शासकीय कार्यालयांमध्ये विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. ‘आरटीओ'ने दोन दिवसात विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या ६० दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
दुचाकीस्वारांचे वाढते अपघात लक्षात घेता नवी मुंबई शहरातील खासगी कंपन्या, शासकीय कार्यालये, महाविद्यालयांमध्ये हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती करण्यात आली होती. याशिवाय हेल्मेट सक्ती बाबत १९४ डी अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, जनजागृती, नोटीस नंतर देखील असंख्य दुचाकीस्वार हेल्मेट घालत नाहीत. त्यामुळे आरटीओ द्वारे गेल्या दोन दिवसांपासून कार्यालयात विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. - हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी - वाशी, नवी मुंबई. 

 

--

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 पोलीस चौकी शोभेची वास्तू