पोलीस चौकी शोभेची वास्तू

शिल्प चौक पोलीस चौकीला टाळे

खारघर : खारघर पोलिसांनी ओवेगाव आणि शिल्प चौक येथे उभारलेल्या पोलीस चौकीला टाळे लागल्याने या पोलीस चौकी   शोभेची वास्तू बनल्या आहेत. या पोलीस चौकी मध्ये कर्मचारी देता का कर्मचारी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.  

खारघर सेक्टर-३० ते  सेवटर-४० सिडको वसाहत तसेच परिसरात असलेल्या ओंवेगाव, ओवेकॅम्प, कुटूक बांधन, फरसीपाडा, घोळवाडी, ओवेपेठ आणि रांजणपाडा आदी गावे मिळून जवळपास एक लाखापेक्षा अधिक नागरिक राहतात. या नागरिकांना काही गुन्हे घडल्यास तीन किलोमीटर दूरवर असलेल्या खारघर पोलीस ठाणे मध्ये जावे लागत होते. तसेच खारघर परिसरातील वाढती लोकसंख्या, चोरी आणि घरफोडीचे वाढते प्रमाण तसेच नागरिकांच्या मागणीचा विचार करुन १० वर्षापूर्वी तत्कालीन ‘खारघर पोलीस ठाणे'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदाळे यांनी ओवेगाव आणि खारघर मधील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल लगत रस्त्याच्या कडेला पोलीस चौकी चौकी सुरु करुन एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचारी तैनात केले होते. त्यामुळे या परिसरात चोरी, घरफोडी आणि गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, खारघर पोलीस ठाणे मध्ये पुरेसे पोलीस बळ नसल्यामुळे पोलीस चौकीला टाळे लावण्यात आल्याने पोलीस चौकी शोभेची वास्तू बनली आहे.

शिल्प चौक पोलीस चौकीला टाळे
खारघर मधील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिल्प चौक परिसरात वासुदेब बळवंत फडके, जलवायू विहार बसथांबा, शाळा आणि काही बँका असल्याने शिल्प चौक वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. अनेक वेळा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगलसूत्र खेचून  पलायन केल्याची घटना घडल्याने खारघर पोलिसांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्ोवून शिल्प चौक या ठिकाणी पोलीस चौकी उभारली होती. खारघर मध्ये चोरी, घरफोडी करण्याच्या घटना वाढत असताना पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुरु केलेल्या पोलीस चौकीला टाळे लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

खारघर सेक्टर-२७ ते सेवटर-४० परिसरातील लोकसंख्या लाखाच्या घरात आहे. तसेच परिसरात चोरी, घरफोडी, सोनसाखळी खेचून फरार होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. सदर पोलीस चौकीत २ पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे. लवकरच नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेवून समस्या मांडणार आहे.- विनोद घरत, युवा नेता - भाजपा, खारघर.

खारघर परिसरात पोलीस गस्त नियमितपणे सुरु असते. पोलीस कर्मचारी गस्त घालून आल्यावर पोलीस चौकीत असतात.- राजीव शेजवळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक - खारघर पोलीस ठाणे.
 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

न्याय देता येत नसेल तर आम्हाला मरण्याची परवानगी द्या; हतबल नातेवाईकांची मुख्यमंत्र्यांकडे याचना