तरुणाला आवरण्यासाठी पोलिसांचा गोळीबार

मद्यधुंद तरुणाचा ‘उलवे नोड'मध्ये हैदोस

नवी मुंबई ः भावासोबत प्रापर्टीवरुन झालेल्या भांडणामुळे संतप्त झालेल्या उलवे, सेक्टर-१६ मधील मोनिष घरत (२३) याने मद्यधुंद अवस्थेत डंपरने इमारतीच्या गेटला तसेच पोलिसांच्या वाहनासह ४ गाडया आणि ३ दुचाकींना धडक देत त्यांचे नुकसान केले. हा पठ्या इतक्यावरच थांबला नाही तर त्याला थांबविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने डंपर घातला. त्यानंतर त्याने पोलीस चौकीवर डंपर चालवून नेत पोलीस चौकीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले. बिथरलेल्या या तरुणाला आवरण्यासाठी अखेर पोलिसांनी डंपरच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर त्याने डंपर घेऊन पलायन केले. मात्र, पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे.  

या घटनेतील आरोपी मोनिष घरत उलवे, सेक्टर-१६ शेलघर येथील बालाजी दर्शन बिल्डींगमध्ये कुटुंबासह राहण्यास आहे. दोन दिवसापूर्वीच त्याने प्रेमविवाह केला आहे. कुख्यात गुन्हेगार विकी देशमुख याने मोनिषचे वडील अशोक घरत यांचे खंडणीसाठी अपहरण करुन त्यांची हत्या केल्याचे गतवर्षी उघडकीस आले आहे. वडिलांच्या निधनानंतर मोनिष आणि त्याच्या भावामध्ये प्रॉपर्टीवरुन वाद सुरु आहेत. ३० मे रोजी रात्री देखील मोनिषचे आपल्या भावासोबत वाद होऊन भांडण झाले. या भांडणाच्या रागात मोनिष याने मद्यधुंद अवस्थेत डंपरच्या सहाय्याने इमारतीचा गेट तोडला. त्यांनतर त्याने त्या आवारात असलेल्या दोन कारला धडक देऊन त्यांचे नुकसान केले. त्यानंतर त्याने खारकोपर रेल्वे स्टेशन समोरील रोडवर विरुध्द दिशेने डंपर चालवून समोरुन येणाऱ्या मोटारसायकल चालकावर डंपर घातला.  

सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर न्हावाशेवा पोलिसांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने दोन पोलिसांवरच डंपर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सेक्टर-१० मधील उलवे पोलीस चौकी येथे गेलेल्या मोनिष घरत याने पोलिसांच्या निर्भया पथकाच्या चारचाकी इर्टिगाला धडक देऊन त्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यानंतर त्याने उलवे, सेक्टर-१० मधील शिवाजीनगर मध्ये असलेल्या न्हावा-शेवा पोलिसांच्या दोन कंटेनर पोलीस चौकींना डंपरची धडक देऊन त्यांचे नुकसान केले. तसेच त्याने चौकीच्या आवारात उभ्या असलेल्या पोलिसांच्या खाजगी वाहनांना धडक देऊन त्यांचे देखील नुकसान केले.  

यावेळी आरोपी मोनिष घरत याला पकडण्यासाठी त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांवर तसेच मदतीस आलेल्या नागरिकांवर त्याने डंपर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सदर आरोपी कुणाचे काहीही ऐकुण घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी डंपरच्या दिशेने गोळीबार केला. यानंतर मोनिष घरत याने डंपर घेऊन पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन सकाळी त्याला क्वॉरीमधून ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी ३१  मे रोजी सायंकाळी त्याच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामकाजात अडथळा आणणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे यासह इतर विविध कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

विविध पोलीस ठाण्यातील २९ पाहिजे, १० फरार आरोपींचा शोध