विविध पोलीस ठाण्यातील २९ पाहिजे, १० फरार आरोपींचा शोध

विशेष पथकाकडून २० दिवसात ३९ आरोपी जेरबंद

नवी मुंबई ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून फरार असलेले आणि पाहिजे असलेल्या आरोपींना पकडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने गत २० दिवसांमध्ये २९ पाहिजे आरोपी आणि १० फरार आरोपी अशा एवूÀण ३९ आरोपींना पकडण्याची कामगिरी केली आहे. सदर विशेष पथकाने २० दिवसांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि सह-पोलीस आयुक्त संजय मोहिते यांनी या पथकाचे विशेष कौतुक करुन त्यांचे अभिनंदन केले आहे.  

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या विविध गुन्ह्यातील अनेक आरोपी अटकेनंतर न्यायालयाकडून जामीन मिळवून बाहेर पडतात. मात्र, त्यानंतर ते सदर खटल्याच्या कामकाजासाठी न्यायालयात हजर राहत नाहीत. त्याशिवाय काही गुन्ह्यातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन फरार होतात. संबंधित पोलीस ठाण्यांकडून अशा पाहिजे आणि फरार आरोपींचा शोध घेण्यात येत असला तरी सदर आरोपी राहण्याचे ठिकाण, मोबाईल नंबर बदलून पोलिसांना गुंगारा देत असतात. अशा पाहिजे आणि फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी न्यायालयाकडून देखील जामीनपात्र तसेच अजामीनपात्र वॉरंट जारी केले जाते. मात्र, त्यानंतर देखील सदर आरोपी न्यायालयात हजर राहत नाहीत. ते न्यायालय आणि पोलिसांना गुंगारा देत आपली अटक टाळत असतात.  

अशा आरोपींना पकडण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि सह-पोलीस आयुक्त संजय मोहिते यांनी ९ एप्रिल रोजी पाहिजे आणि फरार आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथक स्थापन केले होते. सदर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत धनावडे (खारघर पोलीस स्टेशन), पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कुंभार (रबाले पोलीस स्टेशन), हेड पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील (तळोजा पोलीस स्टेशन), जगदीश पाटील (एपीएमसी पोलीस स्टेशन), पोलीस नाईक प्रवीण मेठे (पनवेल शहर पोलीस स्टेशन), पोलीस कॉन्स्टेबल राहुल भोई (वाशी पोलीस स्टेशन) या अधिकारी आणि अंमलदारांचा समावेश आहे. या विशेष पथकाने गत २० दिवसामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यातील २९ पाहिजे आरोपी आणि १० फरार अशा ३९ आरोपींचा वेगवेगळ्या माध्यमातून शोध घेऊन त्यांना पकडण्याची कामगिरी केली आहे. तसेच त्यांना पुढील कार्यवाहीसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.  

सदर विशेष पथकाने पकडलेल्या आरोपींमध्ये फसवणूक, मारामारी, चोरी, चेन स्नॅचींग, घरफोडी यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा समावेश आहे. पोलिसांच्या या विशेष पथकाने २० दिवसांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि सह-पोलीस आयुक्त संजय मोहिते यांनी या पथकाला पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतुक केले आहे. तसेच यापुढील काळात देखील अशीच कामगिरी करण्याच्या त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

6 लाख रुपये किमतीचा एलएसडी पेपर हा अंमली पदार्थ जप्त