वाहतुक पोलीस शाखा द्वारे विशेष मोहीम

एपीएमसी परिसरातील बस थांबे अडवणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

तुर्भे ः वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरातील एपीएमसी फळ मार्केटसह आय.सी.एल. शाळा आणि अन्य गर्दीच्या बस थांब्यांवर वाहने पार्क करुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर एपीएमसी वाहतुक पोलीस शाखेद्वारे कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या विशेष मोहिमेत ५० पेक्षा अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

नवी मुंबई शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते अरुंद आहेत. नवी मुंबई शहरात बस थांब्यांच्या दोन्ही बाजूस १५ मीटर पर्यंतच्या अंतरावर बस व्यतिरिक्त कोणतेही वाहन उभे करु नये असा नियम आहे. या संदर्भात अनेक बस थांब्यांजवळ ‘नो पार्किंग'चे फलकही नवी मुंबई महापालिका आणि नवी मुंबई वाहतूक पोलीस यांच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत. मात्र, ‘नो पार्किंग'चे फलक असतानाही बेशिस्त वाहनचालक बस थांब्याजवळ वाहने उभी करुन प्रवाशांना बसमध्ये चढण्यासाठी अडथळा निर्माण करत असतात. यात आणखी भरीसभर म्हणून रिक्षावाल्यांची बस थांब्यावरील प्रवासी घेण्यासाठी नेहमीच स्पर्धा लागलेली असते. त्यामुळे बस आल्यावर बस थांब्याजवळ वाहतूक कोंडी होते. संपूर्ण नवी मुंबई शहरात वाहतुक काेंडीची समस्या गर्दीच्या बस थांब्यावर दिसून येते. याची नवी मुंबई पोलीस उपायुक्त (वाहतुक) तिरुपती काकडे यांनी नोंद घेतली आहे. पोलीस उपायुक्त (वाहतुक) तिरुपती काकडे यांनी  बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नुकतीच एपीएमसी वाहतुक पोलीस शाखा द्वारे बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली.

एपीएमसी परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, विहांग होंडा, फ्रुट मार्केट आणि इतर बस स्टॉप जवळ पार्क असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच एपीएमसी वाहतुक पोलिसांनी सत्रा प्लाझा या ठिकाणी ‘पार्किंग'चे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. यावेळी ‘सत्रा प्लाझा वाणिज्य संकुल कमिटी'चे अध्यक्ष अरुण पाटील यांनी ‘सत्रा प्लाझा' ठिकाणी ‘पार्किंग'बाबत उपाययोजना करण्याची सूचना वाहतुक पोलिसांना केली.

‘सत्रा प्लाझा' संकुलात केवळ ७०० वाहनांकरिता पार्किंग आहे. व्हिजिटर बाहेरच्या रस्त्यावर वाहने पार्क करत असल्याने या परिसरात अनेकदा वाहतूक कोंडी होते. याविषयी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना येथील दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. या ठिकाणच्या वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी प्रतिदिन कारवाई आणि प्रबोधन केले जाते, अशी माहिती ‘एपीएमसी  वाहतूक पोलीस शाखा'च्या पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी दिली.

एपीएमसी परिसरातील बस थांब्याजवळ वाहने पार्क करुन प्रवाशांना आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर यापुढेही कारवाई चालू ठेवण्यात येणार आहे, असे पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी सांगितले.

दरम्यान, एपीएमसी परिसरातील बस थांब्याजवळ वाहने पार्क करणाऱ्या वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन वाहतुक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी केले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

बस थांब्यांनी घेतला मोकळा श्वास