दुचाकी वाहनांच्या वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी हेल्मेट सक्ती  

नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाकडुन शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट ऑफिसेसना नोटिसा 

नवी मुंबई : दुचाकीस्वाराने व त्याच्या मागील सीटवरुन प्रवास करणाऱया व्यक्तीने हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले असताना देखील अनेक मोटारसायकल चालक हेल्मेटचा वापर करत नसल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे नवी मुंबई प्रादेशीक परिवहन विभागाने हेल्मेट परिधान करण्याबाबत जनजागृती करण्याबरोबरच हेल्मेट सक्ती करण्याबाबत नवी मुंबईतील सर्व शासकीय व खाजगी कार्यालये, कॉर्पोरेट ऑफिसेस, शैक्षणीक संस्था व कंपन्यांना मोटार वाहन अधिनियम 194 (क) नुसार नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे.  

राज्यात दैनंदिन घडणा-या वाहन अपघातांमध्ये सर्वात जास्त अपघात हे दुचाकीस्वारांचे असल्याचे तसेच यात हेल्मेट न घातल्याने मृत्यू पावणा-यांची संख्या अधिक असल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 128 व त्याअनुषंगाने बनविण्यात आलेल्या इतर तरतुदीसनुसार दुचाकीस्वाराने तसेच त्याच्या मागील सीटवरुन प्रवास करणा-या व्यक्तीने हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हेल्मेट सक्तीचे आदेश असताना आजही अनेक दुचाकी वाहन चालक नियम धुडकावून विना हेल्मेट प्रवास करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे दुचाकीधारकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, त्यांना हेल्मेटचे महत्त्व पटावे यासाठी नवी मुंबई प्रादेशीक परिवहन विभागाकडून नवी मुंबईतील सर्व शासकीय व खाजगी कार्यालये, कॉर्पोरेट ऑफिसेस, शैक्षणीक संस्थामधील कर्मचारी-अधिकारी, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती करण्यात येत आहे.  

त्याचप्रमाणे  नवी मुंबईतील विविध शासकीय व खाजगी कार्यालये, कंपन्या, शैक्षणीक संस्था, महाविद्यालयांना नोटीस बजावण्यात येत आहे. या नोटीसद्वारे सदर संस्थेच्या परिसरात विनाहेल्मेट वाहनधारकास तसेच पिलियनवरुन प्रवास  करणा-या व्यक्तीस मज्जाव करण्यात यावा असे सुचित करण्यात आले आहे.  अन्यथा मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 194 (क) अंतर्गत त्यांच्या संस्थेला जबाबदार धरुन संस्थेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशार देण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील शासकीय व खाजगी कार्यालय, शैक्षणिक संस्था व  महाविद्यालयांनी विना हेल्मेट येणा-या दुचाकीस्वारांना आपल्या परिसरात प्रवेश बंद केला आहे.  

हेमांगीनी पाटील (उपप्रादेशिक परिवहन अधिकारी-नवी मुंबई)  परिवहन विभागाच्या आदेशानुसार नवी मुंबई शहरातील खासगी कंपन्या, शासकीय कार्यालय, कॉर्पोरेट ऑफिसेस, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांमध्ये हेल्मेट सक्ती बाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच नवी मुंबईतील अनेक शैक्षणिक संस्था, शासकीय व खाजगी कार्यालयांना हेल्मेट सक्तीबाबत नोटीस बजावण्यात येत असून हेल्मेट न घालणा-या दुचाकीस्वारांना त्यांच्या संस्थेत प्रवेश न देण्याबाबत सुचित करण्यात आले आहे.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाहतुक पोलीस शाखा द्वारे विशेष मोहीम