वाहन चालकांचे प्रबोधन करण्याचे तसेच बेशिस्त वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्राणांतिक अपघातात व मृत्यूंमध्ये २२ टक्क्यांनी घट

नवी मुंबई : नवी मुंबई वाहतुक पोलीस विभागाकडून वाहन चालकांना शिस्त लावण्याबरोबरच अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्याने तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात आल्याने या वर्षात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्राणांतिक अपघातामध्ये २१ टक्क्यांनी तर त्यातील मृतांमध्ये २२ टक्क्यांनी घट झाल्याचे आढळुन आले आहे.  

नवी मुंबईतील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी वाहन चालकांचे प्रबोधन करण्याचे तसेच बेशिस्त वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना देखील त्यांनी वाहतुक विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार नवी मुंबई वाहतुक पोलीस विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी त्यांच्या अधिपत्याखालील १६ वाहतुक शाखेच्या माध्यमातून बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्यावर धडक कारवाईला सुरुवात केली.  

यात अतिवेगाने वाहन चालविणारे, विना हेल्मेट, विना सीट बेल्ट, सिग्नल तोडणे, धोकादायक वाहन चालवणे, दारु पिऊन वाहन चालविणे, वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करणे तसेच वाहतुकिच्या इतर नियमांचे उल्लंघन करणाऱया विरोधात विशेष मोहिमेद्वारे कारवाईला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर नवी मुंबईतील विविध महामार्गावर असलेल्या ब्लॅक स्पॉटचा शोध घेऊन त्यांची सुधारणा करणे, तसेच महामार्गावरील चौकात वाहतुक कोंडीमुळे होणारे अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी अनावश्यक बाह्यमार्ग, सिग्नलचे आधुनिकीकरण, तांत्रिक अडचणी दुर करणे, साईड पट्टया भरणे, खड्डे भरणे आदी उपाययोजना देखील करण्यास सुरुवात केली आहे.    

नवी मुंबई वाहतुक पोलिसांकडून या उपाययोजना करतानाच वाहतुकिच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहन चालकांमध्ये प्रबोधन देखील करण्यात येत असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सन २०२२ च्या तुलने २०२३ मध्ये (जानेवारी ते एप्रिल) प्राणांतिक अपघातामध्ये व त्यातील मृतांमध्ये सुमारे २२ टक्क्यांनी घट झाल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सन २०२२ मध्ये जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यामध्ये विविध मार्गावर ९४ प्राणांतिक अपघाताच्या घटना घडल्या असून त्यात ९५ जणांचा बळी गेला होता. मात्र नवी मुंबई वाहतुक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून बेशिस्त वाहन चालकांवर जोरदार कारवाईला सुरुवात केल्यानंतर २०२३ या वर्षातील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यामध्ये फक्त ७४ प्राणातिक अपघात घडले असून त्यात ७४ लोकांचा मृत्यू झाल्याचे आढळुन आले आहे.  

२०२२ मधिल पहिल्या चार महिन्यामध्ये घडलेल्या १२१ गंभीर अपघातात १५८ व्यक्ती जखमी झाले होते. तर २३ किरकोळ अपघातात २७ जण किरकोळ जखमी झाले होते. तर २०२३ मधील पहिल्या चार महिन्यामध्ये १२८ गंभीर अपघातात १६१ गंभीर जखमी झाल्याची व ३३ किरकोळ अपघातात ४१ किरकोळ जखमी झाले आहेत. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षामध्ये प्राणांतिक अपघातात २१ ने तर मृतांमध्ये २२ ने घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र यावर्षी गंभीर अपघातामध्ये ५ टक्क्यांनी तर त्यातील जखमीमध्ये २ टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे किरकोळ अपघातात ४३ टक्क्याने व त्यात झालेल्या किरकोळ जखमींमध्ये ५२ टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

दुचाकी वाहनांच्या वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी हेल्मेट सक्ती