वाशीतील वाईन शॉप फोडुन सव्वा चार लाखांची रोकड लंपास
नवी मुंबई : घरफोड्या करणारया चोरट्यांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास वाशी सेक्टर-१७ मधील डी.के.वाईन्स हे वाईन शॉप फोडुन त्यातील ३ लाख रुपयांची रोख रक्कम, ४५० दिरम आणि १५०० डॉलर अशी सुमारे सव्वा चार लाख रुपयांची रक्कम चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे . वाशी सेक्टर-१७ मधील मानसरोवर इमारतीमध्ये तळमजल्यावर डी. के. वाईन्स हे वाईन शॉप असून हे वाईन शॉप गुरुवारी रात्री १०.३० वाजता बंद करण्यात आले होते. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या वाईन शॉपचे शटर उचकटुन दुकानात जमा असलेली ३ लाख रुपयांची रोख रक्कम ४५० दिरम आणि १५०० डॉलर अशी सुमारे सव्वा चार लाख रुपयांची रक्कम चोरुन नेली. पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास मानसरोवर इमारतीत राहणारे ज्येष्ठ नागरिक इमारतीच्या खाली आले असताना, त्यांना वाईन शॉपचे शटर अर्धवट उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ वाईन शॉपच्या मालकाला फोन करुन याबाबतची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी वाईन शॉपमध्ये पहाणी केली असता, वाईन शॉपमधील सर्व रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन सीसीटीव्हिच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरु आहे. |