कामोठे गॅस दुर्घटनावेळी महिला पोलिसाची कार्यतत्परता
कामोठे गॅस दुर्घटनावेळी महिला पोलीस शिपाई सविता कदम यांची कार्यतत्परता
नवी मुंबई ः कामोठे, सेक्टर-६ मधील दुधे कॉर्नर या इमारतीत गॅस पाईप लाईनमधील गॅसचा भडका होऊन झालेल्या दुर्घटनेच्या वेळी कळंबोली वाहतूक शाखेतील महिला पोलीस शिपाई सविता कदम यांनी प्रसंगावधान दाखविल्याने मोठा अनर्थ टळला. कदम यांनी दाखविलेल्या कार्यतत्परतेमुळे जखमींना त्वरित मदत मिळाल्याने प्राणहाणी आणि नुकसान टळले आहे. महिला पोलीस शिपाई सविता कदम यांनी केलेल्या सदर कार्यतत्परतेचे सर्वच थरातून कौतुक होत आहे.
कामोठे, सेक्टर-६ मधील दुधे कॉर्नर सोसायटीमध्ये १५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास महानगर गॅसच्या पाईप लाईन जोडणीचे आणि मीटर बसविण्याचे काम सुरु होते. त्यावेळी गॅसच्या पाईप लाईन मधून गॅस गळती झाल्याने अचानक आगीचा मोठा भडका झाला. या दुर्घटनेमध्ये सदर ठिकाणी काम करणारे संतोष मोहिते आणि आशिष मोहिते असे दोघे कामगार होरपळून जखमी झाले. यावेळी सदर घरातील १० महिन्याच्या बाळासह तिघे जण किरकोळ जखमी झाले.
त्याच सुमारास कळंबोली वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई सविता कदम या आपले कर्तव्य आटोपून घरी जात होत्या. यावेळी त्यांना दुधे कॉर्नर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन गंभीररित्या भाजलेले दोन कामगार खाली उतरताना निदर्शनास आले. गॅसच्या पाईप लाईनमधील गॅसचा भडका झाल्याचे तसेच सदर ठिकाणी गॅस गळती अद्याप सुरु असल्याची माहिती जखमी कामगारांकडून मिळाली. मात्र, गॅस गळतीमुळे त्या ठिकाणी कुणीही जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे महिला पोलीस शिपाई कदम यांनी प्रसंगावधान दाखवत तत्काळ माहिती घेऊन खालच्या मजल्यावरुन होणारा गॅस पुरवठा बंद केला. त्यानंतर त्यांनी जखमींना तत्काळ रिक्षाने उपचारासाठी रुग्णालयात पाठवून देतानाच हेल्पलाईनवर सदर घटनेची माहिती देऊन घटनास्थळी स्थानिक पोलीस, ॲम्ब्युलन्स, अग्निशमन दलाला पचारण केले.
महिला पोलीस शिपाई कदम यांच्या सदर कार्यतत्परतेमुळे होणारा मोठा अनर्थ टळला. तसेच सदर दुर्घटनेतील जखमींना त्वरित मदत मिळाल्याने प्राणहाणी आणि नुकसान देखील टळले. त्यामुळे महिला पोलीस शिपाई सविता कदम यांनी केलेल्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.