वाशी पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करुन पालकांची केली बोळवण 

वाशीतील डे केअर सेंटरमध्ये बालकाला आयाकडुन मारहाण

 नवी मुंबई : वाशीतील एका डे केअर सेंटरमध्ये कामाला असलेल्या आयाने १६ महिन्याच्या बालकाला थोबाडीत मारुन त्याला उचलून बाजुला ढकलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालकांनी आपल्या मोबाईलवर डे-केअरमधील सीसीटीव्हि फुटेजची तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारणात वाशी पोलिसांनी देखील बालकाला मारहाण करणारी आया व डे-केअरचालक या दोघींविरोधात फक्त अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करुन पीडित बालकाच्या पालकांना कोर्टात जाण्यास सांगितले. त्यामुळे पीडित बालकाच्या पालकांनी मंगळवारी सह पोलीस आयुक्त संजय मोहिते यांची भेट घेतल्यानंतर मोहिते यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 

या घटनेतील १६ महिन्याच्या पीडित बालकाला त्याच्या पालकांनी मागील नोव्हेंबर महिन्यांमध्ये वाशी सेक्टर-२८ मधील स्मार्ट थॉट्स केअर सेंटरमध्ये दाखल केले होते. गत ७ फेब्रुवारी रोजी पीडित बालक हा नेहमीप्रमाणे डे केअर सेंटरमध्ये गेला होता. दुपारी पीडित बालक बसलेल्या टेबलावर त्याच्यासमोर जेवणाचे ताट ठेवण्यात आल्याने पीडित बालकाने सदर ताटातील चमचा घेऊन त्यातील अन्न खाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तेथील आयाने त्याच्या थोबाडीत मारुन त्याला क्रूरपणे उचलून बाजुला केल्याने पीडित बालक बराच वेळ रडत राहिले. घरी गेल्यानंतर देखील पीडित बालक रडत राहिल्याने त्याच्या पालकांनी आपल्या मोबाईलवरील डेकेअर मधील सीसीटीव्हि फुटेजची तपासणी केली. त्यानंतर डेकेअरमधील आयाकडुन त्याला मारहाण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. 

 त्यानंतर पीडित बालकाच्या पालकांनी दुसऱ्या दिवशी डेकेअर चालक महिलेकडे याबाबत चौकशी केली असता, त्यांनी उलट असे प्रकार त्यांच्याकडे होत नसल्याचे सांगत पीडित बालकांच्या आई वडिलांचे आरोप फेटाळून लावले. तसेच त्यांच्या मोबाईलवरील सीसीटीव्हीचे कनेक्शन बंद करुन टाकले. त्यामुळे पीडित बालकांच्या आई वडिलांना यापुर्वीचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करता आली नाही. त्यामुळे या पालकांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वाशी पोलीसांनी देखील सदर प्रकार गांभीर्याने न घेता, फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करुन पालकांना कोर्टात जाण्याचा सल्ला दिला. या प्रकारामुळे नाराज झालेल्या पीडित बालकांच्या आई वडिलांनी मंगळवारी नवी मुंबईचे सह पोलीस आयुक्त संजय मोहिते यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर मोहिते यांनी वाशी पोलिसांना या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

महिलेविरोधात मारहाणीसह अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण या कलमाखाली गुन्हा दाखल