शनिवारी पहाटे वाशी सेक्टर -७ मधील रो हाऊस मध्ये १९ लाख ८५ हजार रुपयांची घरफोडी

वाशीत तब्बल १९ लाख ८५ हजार रुपयांची घरफोडी

नवी मुंबई : अज्ञात चोरट्यानी शनिवारी पहाटे वाशी सेक्टर -७ मधील रो हाऊस फोडून त्यातील रोख रक्कमेसह वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असा तब्बल १९ लाख ८५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

वाशी सेक्टर ०७ मधील रो-हाउसमध्ये  राहणाऱ्या सुनिताराणी दुर्गादास सिंघल (७६) यांचा मोठा मुलगा विरेंदर कुमार हा खारघर मध्ये राहण्यास आहे. सुनिताराणी यांच्या याच मुलाचा वाढदिवस असल्याने त्या २५ जानेवारी रोजी पती विरेंदर कुमार याच्यासह वाढदिवसासाठी खारघर येथील घरी गेल्या होत्या. यादरम्यान सुनिताराणी यांच्या घरात  काम करणारा विष्णु हा कामगार एकटाच होता. मात्र तो देखील २७ जानेवारी रोजी सायंकाळी सुनिताराणी राहत असलेल्या रो हाउसला लॉक लावुन खारघर येथे वाढदिवसासाठी गेला होता.

हिच संधी साधून अज्ञात चोरट्यानी शनिवारी पहाटे सुनिताराणी यांच्या रो हाऊसच्या तळमजल्यावरील बेडरूमच्या पाठीमागील खिडकीची लोखंडी ग्रील उचकटुन त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर सदर चोरटयांनी सुनिताराणी यांच्या घरातील १५ लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने असा एकूण १९ लाख ८५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.दुसऱ्या दिवशी सकाळी सुनिताराणी यांच्या घरातील नोकर विष्णू हा खारघर येथून वाशी येथील रो हाऊस जवळ आल्यानंतर त्यांच्या रो हाऊसच्या खिडकीचे ग्रील कोणीतरी काढल्याचे त्याच्या निदर्शनास आले.

 त्यामुळे त्याने याबाबतची माहिती सुनिताराणी यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ आपल्या घरी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी आपले रो हाऊस उघडून त्याची तपासणी केली असता, चोरट्यांनी त्यांच्या घरातील सर्व दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची त्यांच्या लक्षात आले. त्यांनतर त्यांनी याबाबतची माहिती वाशी पोलिसाना दिली. त्यांनतर वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर वाशी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवी मुंबईत गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाच्या खरेदी विक्रीत वाढ