उत्तरप्रदेश येथील हत्या प्रकरणातील चार फरार आरोपी अटकेत

नवी मुंबई : उत्तर प्रदेश राज्यातील देल्हुपुर भागात हत्या करुन नवी मुंबईत पळून आलेल्या चौकडीला गु्न्हे शाखा युनिट-२ ने खारघर परिसरातुन अटक केली आहे. इम्रान असीर खान (३०), मोहम्मद सलमान असीर खान (२९), गुफारान असीर खान (२०) आणि मोहम्मद मुजीद इब्रर अली (२२) अशी या मारेकऱ्यांची नावे असून त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.

या प्रकणात अटक करण्यात आलेले चारही आरोपी व मृत हे सर्व उत्तरप्रदेश राज्यातील प्रतापगढ जिल्ह्यातील तौकलपुर येथे राहणारे आहेत. या प्रकरणातील मृत व आरोपी यांच्यात पुर्वीपासून वाद होता. गत १४ डिसेंबर रोजी मृत रकिब हा त्याचा भाचा असफाक याच्यासोबत मोटारसायकलवरुन देल्हुपुर बाजारातून घरी जात असताना, आरोपींनी ब्रिजा कारने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली होती. त्यांनतर त्यांनी रकिब आणि असफाक या दोघांवर लाठ्याकाठ्या, लोखंडी सळईने हल्ला केला होता. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील अग्निशस्राने त्यांच्यावर गोळीबार करून पलायन केले होते. या हल्ल्यात जखमी झालेल्या रकिबचा उपचारादरम्यान दोन दिवसानंतर मृत्यू झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी हे गुन्हा घडल्यानंतर फरार झाले होते.

त्यातील चार आरोपी हे नवी मुंबईत पळून आले होते. याबाबतची माहिती देल्हुपुर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती नवी मुंबई पोलिसांना दिली होती. सदर माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट-२चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे, संदिप गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील, वैभवकुमार रोंगे व त्यांच्या पथकाने या आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली होती. या 

तपासा दरम्यान सदर गुन्ह्यातील ४ आरोपी हे खारघरमध्ये असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास करुन मिळालेल्या माहितीवरुन खारघर सेक्टर-८ भागातून चारही आरोपींना अटक केली. त्यानंतर या चारही आरोपींना उत्तरप्रदेश येथील देल्हूपूर पोलिसांच्या स्वाधीन केले.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अज्ञात चोरट्यांकडून  कळंबोली  सेक्टर-४ ई मध्ये भरदिवसा घरफोडी