एक्सपायर दुधाची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार जागरुक नागरिकामुळे उघडकीस

ऐरोलीतील रिलायन्स मार्टमधुन एक्सपायर झालेल्या दुधाची विक्री 

नवी मुंबई : ऐरोलीतील रिलायन्स मार्टमधुन कमी पैशांमध्ये मुदत संपलेल्या (एक्सपायर) दुधाची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार एका जागरुक नागरिकामुळे उघडकीस आला आहे. त्यामुळे रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणात ऐरोलीतील रिलायन्स मार्ट मधील तीन कर्मचारी व रिलायन्स मार्टमधुन मुदत संपलेल्या दुधाची कमी किंमतीत खरेदी करुन त्याची विक्री करणारा दुध डेअरी मालक अशा एकुण चार जणांवर  फसवणुकीसह अन्न सुरक्षा मानके अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.  

रबाळे एमआयडीसीतील पंचशिलनगरमध्ये राहणारे अमोल उघाडे (31) हे व्यवसायाने वकील असून गत 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता आपल्या कार्यालयातुन घरी जात होते. यावेळी वाटेत असलेल्या धर्मराज दुध डेअरीचा मालक सुरेश हा आपल्या शेजारील बाथरुममध्ये दुधाच्या पिशव्या फाडुन त्यातील दुध टोपात टाकुन त्यात बादली मधील पाणी मिसळत असल्याचे अमोल उघाडे यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे उघाडे यांनी साई अमृत व मदर डेअरी मिल्क या कंपन्याच्या दुधाच्या पिशवीवरील कालबाह्य तारीख पडताळुन पाहिली असता, ते दुध 26 डिसेंबर रोजी कालबाह्य झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.  

त्यामुळे अमोल उघाडे यांनी सुरेशकडे त्याबाबत विचारपुस केली असता, त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर त्याने सदरचे कालबाह्य (एक्सपायर) झालेल्या दुधाच्या पिशव्या ऐरोली सेक्टर-12 मधील रिलायन्स मार्टमधुन मागील 6 महिन्यांपासून खरेदी करुन आणत असल्याचे सांगितले. तसेच रिलायन्स मार्ट मधील महिला स्टाफ फोन करुन त्याला बोलावुन घेऊन एक्सपायरी झालेले साई अमृत व मदर डेअरी मिल्क या कंपन्याच्या दुधाच्या पिशव्या कमी किंमतीत 25 रुपये लिटर प्रमाणे विकत देत असल्याचे देखील सुरेशने सांगितले. तसेच त्या दिवशी रिलायन्स मार्टमधुन त्याने एक्सपायरी झालेले दोन्ही कंपन्यांचे 16 लिटर दुध आणल्याचे बिल देखील दाखविले.  

त्यामुळे दुसऱया दिवशी अमोल उघाडे हे स्थानिक नागरिक, महिला मंडळासह ऐरोली सेक्टर-12 मधील रिलायन्स मार्टमध्ये जाब विचारण्यासाठी गेले असता, तेथील कर्मचाऱयांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र नागरिकांचा रोष पाहुन त्यांनी  आपली चुक कबुल करुन वरिष्ठांसोबत बोलण्यास सांगितले. त्यानुसार 29 डिसेंबर रोजी  रिलायन्स मार्टचे काही प्रतिनीधी अमोल उघाडे यांना भेटण्यासाठी रबाळे येथे आले होते. यावेळी त्यांनी अमोल उघाडे यांना काही पैसे घेऊन सदर प्रकरण मिटविण्याचा आग्रह केला. मात्र उघाडे यांनी त्यांना नकार देऊन रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रिलायन्स मार्टमधील गोपाल मोहिबा, अनिल मोरे, शलाका शिंदे व डेअरी मालक सुरेश डांगी या चौघांविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मसाजच्या नावाखाली अनैतिक धंदे करणाऱया सीबीडीतील दोन स्पावर छापे