पोलिसांकडुन सिम कार्ड विक्रेत्यांना के.वाय.सी. संबंधातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश

नवी मुंबई पोलिसांकडुन कलम 144 नुसार आदेश जारी

नवी मुंबई : दहशतवादी व समाजविघातक कृत्य करणाऱया व्यक्तींच्या संभाव्य कारवाया रोखण्याच्या उद्देशाने नवी मुंबई पोलिसांनी आपल्या हद्दीतील घरमालक-भाडेकरु, नंबर फ्लेट बनविणारे, सायबर कॅफे चालक, सिमकार्ड विक्रेते व जुन्या वाहनांची खरेदी विक्री करणारे व्यावसायिक यांच्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 नुसार आदेश जारी केले आहेत. तसेच घर मालक आणि भाडेकरुंनी, वाहनांचे नंबरफ्लेट बनवून देणारे, सायबर कॅफे चालक, सिम कार्ड विक्रेते व जुन्या वाहनांची खरेदी विक्री करणाऱया व्यावसायीकांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत सुचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक संशयास्पद हालाचालींची माहिती पोलिसांना तात्काळ देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱया व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.  

दहशतवादी व समाजविघातक कृत्य करणाऱया व्यक्ती लपण्यासाठी निवासी परिसराचा वापर करु शकतात तसेच ते सायबर कॅफेमध्ये इंटरनेट सुविधेचा किंवा इतर सुविधांचा गैरवापर करु शकतात तसेच किरकोळ सिमकार्ड विक्रेत्यांद्वारे विकल्या जाणा-या सिमकार्डचा दुरुपयोग करुन त्याद्वारे एखादे समाजविघातक कृत्य करु शकतात. किंवा सेकंड-हँड वाहनांच्या डीलर्सद्वारे विकल्या जाणाऱया वाहनांचा किंवा ऑटोमोबाईल्सचा गैरवापर करु शकतात. अथवा नंबर फ्लेट निर्मात्यांद्वारे परिसरातील वाहनांचे खरेदी-विकी केल्या जाणाऱया वाहनांच्या नंबर फ्लेटचा देखील गैरवापर करु शकतात. अशा प्रकारचे एखादे कृत्य हे मानवी जीविताला गंभीर धोका उद्भवू शकतो. तसेच सुरक्षितेला व सार्वजनिक मालमत्तेला हानी पोहोचवू शकतात. सार्वजनिक शांतता भंग करु शकतात. त्यामुळे विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त प्रशांत मोहिते यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 नुसार आदेश जारी केले आहेत.  

या आदेशानुसार प्रत्येक घरमालकाने आपले घर ज्या व्यक्तीला भाडÎाने दिले आहे, त्या भाडेकरुची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात द्यावी. मोटार वाहनाचे नंबर फ्लेट बनविणाऱया व्यवसायीकांनी नंबरफ्लेट खरेदी करणाऱया व्यक्तींचा व वाहनाचा तपशील संबंधित पोलिस स्टेशनला द्यावा. तसेच सायबर कॅफेचे मालक, चालक व ऑपरेटर यांनी ओळखीचा पुरावा सादर करणाऱया व्यक्तीलाच सायबर कॅफेमध्ये इंटरनेट सुविधा वापरण्याची परवानगी द्यावी. तसेच सायबर कॅफेचे मालक, चालक व ऑपरेटर यांनी देखील सायबर कॅफेमध्ये इंटरनेट सुविधेचा वापर करण्याऱया व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा, त्यांचे नाव, पत्ता, तारीख आणि वेळ यांचा तपशील नमूद करणारी एक नोंदवही ठेवावी. तसेच संशयित व्यक्ती व त्यांच्या हालचालीची माहिती तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात द्यावी.  

त्याचप्रमाणे किरकोळ सिमकार्ड विक्रेत्याने दुरसंचार विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि प्रीपेड किंवा पोस्टपेड सिम कार्ड विक्रीचा व्यवसाय करताना के.वाय.सी. संबंधातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. विक्री केलेल्या सिम कार्डचा तपशील सिम कार्ड खरेदीदाराचे नाव, रहिवासी पुरावा आणि ओळखीचा पुरावा आदीची योग्य रजिस्टरमध्ये नोंद करावी. सदरचे रजिस्टर हे पोलीस अधिकाऱयांना तपासणी व पडताळणीसाठी तत्काळ उपलब्ध करुन द्यावे. त्याचप्रमाणे जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करणारे ऑटोमोबाईल्सच्या डीलर्सनी वाहनांच्या खरेदी विक्री करणाऱयांची यादी, ओळखीचा व पत्त्याच्या पुरावा आणि खरेदी, विक्री केलेल्या वाहनांचे चेसिस नंबर, इंजिन नंबर, प्रादेशिक परिवहन विभागाकडील नोंदणी क्रमांक इत्यादी तपशील नोंद करुन ठेवण्याबाबत या आदेशात सुचित करण्यात आले आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

एक्सपायर दुधाची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार जागरुक नागरिकामुळे उघडकीस