अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या विरोधात जुहुगाव ग्रामस्थ आक्रमक

नवी मुंबई -: नवी मुंबई वाशी, जुहुगाव आणि परिसरात मागील काही महिन्यांपासून अंमली पदार्थ,मद्य सेवन करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.मात्र यांच्यावर कारवाई करण्यास पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांनी  जुहुगाव परिसरात अंमली पदार्थ,मद्य सेवन करू नये म्हणून जुहुगाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मनाई फलक लावून आवाहन करण्यात येत आहे.

मागील दोन तीन वर्षांपासून नवी मुंबई शहराला अंमली पदार्थांचा विळखा पडला आहे आणि या अंमली पदार्थाच्या आहारी तरुण तरुणी सोबतच शाळकरी मुले ही जात आहेत. त्यामुळे जागा भेटेल तिथे अंमली पदार्थ सेवन करणारे बसत असतात. जुहुगाव परिसरातील मैदान, खाडी तसेच मरीआई मंदिरा समोरील जागेत अंमली पदार्थ तसेच मद्य सेवन  करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे या भागातील महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र अशा प्रकारे अंमली पदार्थ, मद्य सेवन करणाऱ्यांकडे नवी मुंबई पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे आपला परिसर आपली  जबाबदारी या उद्देशाने जुहुगाव ग्रामस्थ पुढे आले आहेत आणि अशा नागरिकांनी  जुहुगाव परिसरात अंमली पदार्थ, मद्य सेवन करू नये म्हणून जुहुगाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मनाई  तसेच निषिद्ध फलक परिसरात लावले गेले आहेत अशी माहिती अध्यक्ष हिमांशू पाटील यांनी दिली आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जफ्त