प्रियकरानेच मित्राच्या मदतीने प्रेयसीची हत्या केल्याचे उघड  

पनवेल तालुक्यातील धामणी गावच्या हद्दीत घडलेल्या हत्या प्रकरणाची उकल  

नवी मुंबई : पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळ गत आठवडयात घडलेल्या महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात गुन्हे शाखा युनिट-2 ला यश आले आहे. या घटनेतील मृत महिलेबाबत कुठल्याही प्रकारची माहिती नसताना, गुन्हे शाखेने त्या महिलेने घातलेल्या एका विशिष्ठ ब्रँडच्या चप्पलवरुन मृत महिलेची ओळख पटवुन या हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केली आहे.  

गुन्हे शाखेने या प्रकरणात रियाज समद खान (36) व त्याचा मित्र इम्रान इस्माईल शेख (28) या दोघांना अटक केली आहे. रियाज हा घणसोलीत जिम ट्रेनर म्हणुन तर त्याचा मित्र इम्रान हा कुरीयर डिलीव्हरीचे काम करत होता. या घटनेतील मृत महिला उर्वशी सत्यनारायण वैष्णव (27) हि कोपरखैरणेत राहण्यास होती. तसेच ती बारमध्ये काम करत होती. उर्वशी ही ज्या बारमध्ये काम करत होती, त्या रियाज हा नियमित जात असल्याने त्याची उर्वशी सोबत जवळीक वाढुन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. गेल्या अनेक महिन्यापासुन त्यांच्यामध्ये प्रेम संबंध सुरु होते. त्यामुळे उर्वशीने रियाज च्या पाठीमागे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र रियाजला तिच्यासोबत लग्न करायचे नसल्याने त्याने तिचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याने आपला मित्र इम्रान याला मदतीसाठी घेतले होते.  

त्यानुसार गत 13 डिसेंबर रोजी रियाजने आपली प्रेयसी उर्वशी हिला लाल रंगाच्या बलेनो कारमध्ये घेतल्यानंतर रियाजने कारमध्येच रस्सीच्या सहाय्याने तिचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर रियाज आणि इम्रान या दोघांनी मध्यरात्रीच्या सुमारास तिचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पनवेल मधील धामणी गावच्या हद्दीत गाढी नदीच्या पात्रात तिचा मृतदेह टाकुन पलायन केले होते. दुसऱया दिवशी उर्वशीचा मृतदहे सापडल्यानंतर पनवेल तालुका पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा युनिट-2 कडुन देखील या हत्या प्रकरणाचा समांतर तपास करण्यात येत होता. सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे अथवा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.  

त्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे, संदिप गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील, सुदाम पाटील आदींच्या पथकाने या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मृत उर्वशीची ओळख पटविण्यासाठी नवी मुंबईसह आजुबाजुच्या परिसरात हरविलेल्या महिलेचा शोध घेतला. मात्र त्यात उपयुक्त माहिती न मिळाल्याने गुन्हे शाखेने घटनास्थळावर मिळालेल्या भौतिक वस्तुवरुन तपास करण्यास सुरुवात केली. या तपासात पोलिसांना उर्वशीने ज्या दुकानातुन चप्पल खरेदी केली होती, त्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यावरुन पोलिसांनी  दोन्ही आरोपींची ओळख पटवुन त्यांना अटक केली.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सानपाडा सेक्टर-5 भागात राहणा-या एका विवाहितेने पती व सासुच्या छळाला कंटाळुन आत्महत्या