अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेली पाच जणांची टोळी जेरबंद  

नवी मुंबई : एपीएमसीतील मॅफको मार्केट परिसरात अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या पाच जणांच्या टोळीला एपीएमसी पोलिसांनी सापळा रचुन अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 8 लाख रुपये किंमतीचे 80 ग्रॅम वजनाचे हेरॉईन हे अंमली पदार्थ जप्त केले आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे मुळचे केरळ राज्यातील असून ते हेरॉईन हे अंमली पदार्थ केरळ येथे घेऊन जाणार असल्याचे तपासात आढळुन आल्याची माहिती परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसारे यांनी दिली. 

एपीएमसीतील मॅफको मार्केट परिसरात काही व्यक्ती हेरॉईन हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वसीम शेख, निलेश शेवाळे व त्यांच्या पथकाने गत 17 डिसेंबर रोजी रात्री 8 च्या सुमारास एपीएमसी सेक्टर-18 मॅफको मार्केट मधील यु.पी. कोल्ड स्टोरेज परिसरात सापळा लावला होता. यावेळी त्याठिकाणी संशयास्पदरित्या आलेल्या अबु बकर सिद्दीकी (46),मोहम्मद आमन महमुद पी (26), मोहम्मद उमर अकम (38), नंदु सुब्रमण्यम (28) आणि नसीर मुसा कोइस (30) या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  

त्यानंतर पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळ 8 लाख रुपये किंमतीचे 80 ग्रॅम वजनाचे हेरॉईन हे अंमली पदार्थ आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी या सर्वांविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात एनडीएपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली. न्यायालयाने या सर्वांची 21 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या आरोपींनी सदरचे अंमली पदार्थ केरळ येथे घेऊन जाण्यासाठी आणल्याचे प्राथमिक तपासात आढळुन आले आहे. मात्र त्यांनी सदरचे अंमली पदार्थ कुठून व कुणाकडुन आणले याबाबत अधिक तपास करण्यात येत असल्याचे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

प्रियकरानेच मित्राच्या मदतीने प्रेयसीची हत्या केल्याचे उघड