20 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारा वाशीतील केंद्रीय जीएसटी विभागाचा अधिक्षक अटकेत 

नवी मुंबई : मुंबईतील एका व्यावसायीकाच्या कंपनी विरोधात सुरु असलेला तपास बंद करुन त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न करण्यासाठी 20 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणा-या नवी मुंबईतील केंद्रीय जीएसटी विभागाचे अधिक्षक बी.सोमेश्वर राव यांना सीबीआयच्या अँन्टी करप्शन ब्युरोने अटक केली आहे. तसेच त्यांची कसुन चौकशी सुरु केली आहे.  

या प्रकरणातील तक्रारदार झाकिर हुसेन शहा हा मुंबईतील गोंवडी भागात राहण्यास असून त्याचा क्रॅप खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. झाकीरने सुरु केलेल्या 6 कंपन्यांचे व्यवहार हे संशयास्पद असल्याचे सांगत वाशी येथील केंद्रीय जीएसटी विभागाचे अधिक्षक बी.सोमेश्वर राव यांनी दोन महिन्यापुर्वी झाकीरला नोटीस पाठविली होती. त्यानुसार झाकीर हा भेटण्यासाठी गेला असताना, बी.सोमेश्वर राव यांनी झाकीर याने 6 बोगस कंपन्या स्थापन केल्याचे तसेच त्या कंपन्याचे ए.आर.ट्रेडर्स या कंपनीसोबत झालेले काही व्यवहार हे संशयास्पद असल्याचे सांगितले. त्यामुळे त्या 6 कंपन्याचा सव्वा कोटी रुपयांचा दंड त्याला सीजीएसटी विभागात भरावा लागेल असे झाकीरला सांगितले.  

अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करुन त्याला व त्याच्या कुटुंबियांना अटक करण्याची भिती दाखविली होती. तसेच त्याच्या कंपनी विरोधात सुरु असलेला तपास बंद करुन त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न करण्यासाठी 20 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर राव यांनी 1 डिसेंबर रोजी झाकीर शहा याच्या मुंब्रा येथील कंपनीच्या गोडाऊनवर जाऊन त्याच्या सहा कंपन्यांची यादी तेथील कर्मचाऱ्यांना देऊन ते निघुन गेले होते. त्यामुळे गत 12 डिसेंबर रोजी झाकीर हा बी.सोमेश्वर राव यांना भेटण्यासाठी वाशीतील सत्रा फ्लाझा येथे गेला असताना पुन्हा त्यांनी झाकीर याच्याकडे 20 लाख रुपये लाचेची मागणी केली. मात्र तडजोडीअंती राव यांनी 10 लाख रुपये लाचेची मागणी केली.   

त्यामुळे झाकीर याने सीबीआयच्या ऍन्टी करफ्शन ब्युरोकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने अँन्टी करप्शन ब्युरो च्या अधिकाऱ्यांनी याची पडताळणी केली असता, बी.सोमेश्वर राव यांनी झाकीर याच्याकडे 20 लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अँन्टी करप्शन ब्युरोने नवी मुंबईतील सीजीएसटी विभागाचे अधिक्षक बी.सोमेश्वर राव यांच्या विरोधात गत बुधवारी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अधिक तपास करुन सोमवारी त्यांना लाचेची मागणी केल्याप्रकरणी अटक करुन त्यांची कसुन चौकशी सुरु केली आहे.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आलेली पाच जणांची टोळी जेरबंद