गोवा राज्यातून मुंबईत बेकायदेशीर रित्या नेला जाणारा ७७ लाख रुपये किमतीचा मद्याचा साठा जप्त 

नवी मुंबई : नाताळ व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून मुंबईत बेकायदेशीर रित्या नेला जाणारा तब्बल ७७ लाख रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित रॉयल ब्लु व्हिस्कीच्या मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास पकडला आहे. सायन पनवेल मार्गावरील कोपरा गाव येथे करण्यात आलेल्या या कारवाईनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ट्रक चालक संदीप पंडित (३८) व क्लिनर समाधान धर्माधिकारी (३०) या दोघांना ताब्यात घेतले आहे. 

नाताळ व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून मुंबईत बेकायदेशीर रित्या मोठया प्रमाणात मद्याचा साठा नेला जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क पनवेल विभागाचे निरीक्षक संजय पुरळकर , दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे , शिवाजी गायकवाड , सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुभाष जाधव , जवान विलास चव्हाण ,महिला जवान रमा कांबळे आदींच्या पथकाने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सायन -पनवेल मार्गावरील खारघर येथील टोल नाक्याजवळ संशयित मद्याचा ट्रक अडवून त्याची तपासणी केली. यावेळी सादर ट्रकमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित रॉयल ब्लु व्हिस्कीच्या मद्याचा साठा आढळून आला. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तब्बल ७७ रुपये किमतीचे अवैध गोवा मद्याचे रॉयल ब्लु व्हिस्कीचे ८९८ बॉक्स जप्त केले. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ट्रक चालक व क्लिनर या दोघांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरु केली आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

20 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारा वाशीतील केंद्रीय जीएसटी विभागाचा अधिक्षक अटकेत