विक्की इंगळेच्या मृत्यू प्रकरणात तत्कालीन महापालिका आयुक्तांसह ७ डॉक्टरवर गुन्हा दाखल 

नवी मुंबई : वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयात मार्च २०१९ मध्ये विक्की इंगळे या तरुणाचा झालेल्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश वाशी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार वाशी पोलिसांनी या प्रकरणात महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यासह वाशी रुग्णायलायतील वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत जवादे यांच्यासह एकूण ७ डॉक्टरवर बेदरकारपणे, हायगयी करून निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. एका तरुणाच्या मृत्यू प्रकरणात तत्कालीन महापालिका आयुक्तांसह ७ डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

तुर्भे स्टोअर मधील शिवशक्ती नगर मध्ये राहणारे  राजेंद्र इंगळे यांचा मुलगा विक्की इंगळे (28) याला दिनांक 28 मार्च 2019 रोजी सकाळी 6.वाजण्याच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, तसेच त्याला घाम येवून, घश्यात दुखून उलटी होत असल्याने वडील राजेंद्र इंगळे यांनी त्याला तातडीने वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. त्याठिकाणी विक्कीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास विक्कीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राजेंद्र इंगळे यांनी महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळॆ विक्की इंगळे याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी तक्रारी व पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर त्यांनी उपोषण देखील केले होते. 

त्यावेळी तत्कालीन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी राजेंद्र इंगळे यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत चौकशी करण्यासाठी समिती देखील गठीत केली होती. मात्र त्यानंतर देखील एकाही डॉक्टरवर कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळॆ राजेंद्र इंगळे यांनी बेलापूर न्यायालयात धाव घेऊन याबाबत दाद मागितली होती. न्यायालयाने याची गंभीर दाखल घेऊन या प्रकरणात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याचे आदेश वाशी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार वाशी पोलिसांनी महापालिका रुग्णायलायतील वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत जवादे, डॉ.हेमंत इंगोले, डॉ.किरण वळवी, डॉ.प्रभा सावंत, डॉ.शरीफ तडवी व डॉ.आरती गणवीर या सहा डॉक्टर विरोधात तसेच या प्रकरणात समितीने केलेल्या चौकशीत महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा दिसून आल्यानंतर देखील तत्कालीन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दोषी असलेल्या डॉक्टरवर कोणतीही कारवाई न केल्याने त्यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

गोवा राज्यातून मुंबईत बेकायदेशीर रित्या नेला जाणारा ७७ लाख रुपये किमतीचा मद्याचा साठा जप्त