ऑनलाईन गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन उच्च पदस्थ अधिक-याची फसवणूक

शेअर मार्केटमधील ऑनलाईन गुंतवणुकीच्या बहाण्याने रिझर्व्ह बँकेतील उच्च पदस्थ अधिकाऱयाला 60 लाखांचा गंडा 

नवी मुंबई : शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन एका टोळीने रिझर्व्ह बँकेतील एका उच्च पदस्थ अधिकाऱयाकडुन तब्बल 65 लाख रुपये उकळुन त्यांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सानपाडा पोलिसांनी या प्रकरणातील 6 जणांच्या टोळी विरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.  

या प्रकरणात फसवणुक झालेली व्यक्ती सानपाडा भागात राहण्यास असून ते रिझर्व्ह बँकेत उच्च पदावर कार्यरत आहेत. डिसेंबर 2020 मध्ये ऑनलाईन फसवणुक करणाऱया टोळीतील शशि जैन नावाच्या महिलेने त्यांना संपर्क साधुन शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यासंदर्भात चौकशी केली होती. मात्र त्यावेळी या अधिकाऱयाने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र त्यानंतर सदर महिलेने वारंवार या अधिकाऱयाला संपर्क साधुन त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास तयार केले होते. त्यानंतर या अधिकाऱयाने आपल्या पत्नीच्या नावे कॅपिटल मार्ट फर्म या मध्यप्रदेश भोपाळ येथील कंपनीत ऑनलाईन ट्रेडिंग खाते उघडले होते. त्यानंतर शशि जैन हिने या अधिकाऱयाला वेगवेगळ्या बँक खात्यात अडीच लाख रुपये जमा करण्यास सांगितले.  

त्यानुसार या अधिकाऱयाने सदर रक्कम जमा केल्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये  शिखा चौहान हिने या अधिकाऱयाच्या खात्यात 1 लाख रुपये ऑनलाईन ट्रन्सफर करुन त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर त्याच टोळीतील इतर महिलांनी व शशी जैन हिने सांगितल्यानुसार या अधिकाऱयांनी वेगवेगळ्या बँक खात्यात आणखी काही लाखांची रक्कम जमा केली. यादरम्यान शशि जैन हि या महिन्यात नक्की फायदा होईल असे अमिष या अधिकाऱयाला दाखवत होती. त्यामुळे ती सांगेल त्याप्रमाणे हे अधिकारी लाखो रुपयांची रक्कम वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर करत होते. अशा पद्धतीने या अधिकाऱयाने ऑनलाईन गुंतवणुक व त्यातून मिळणा-या नफ्याच्या अमिषाला बळी पडुन फेब्रुवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत तब्बल 65 लाख रुपयांची रक्कम शशि जैन या महिलेने सांगितल्यानुसार वेगवेगळ्या बँक खात्यात पाठवुन दिली.  

यादरम्यान त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतविलेल्या रक्कमेवरील नफ्याची मागणी केली असता, शशि चौहान हिने त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केल्यानंतर या अधिकाऱयाने आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. त्यानंतर शशी जैन हिने त्यांना 5 लाख रुपये पाठवुन दिले. त्यानंतर या अधिकाऱयाने शशी जैन हिच्याकडे वारंवार आपल्या पैशांची मागणी केल्यानंतर तीने उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. काही दिवसानंतर शशी जैन हिने आपले तिन्ही मोबाईल फोन बंद करुन टाकले. त्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

सेलेरियो कार पलटी झाली तर इनोव्हा पडली नाल्यात