प्रवासी लोकल पकडण्याच्या नादात शॉर्टकट मारत असल्याने त्यांचा हकनाक बळी

हार्बर, ट्रान्स-हार्बर रेल्वे मार्गावर ११ महिन्यात २०० अपघाती मृत्यू

नवी मुंबई ः हार्बर आणि ट्रान्स-हार्बर रेल्वे मार्गावरील वाशी आणि पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोवंडी ते पनवेल आणि रबाले ते जुईनगर या दोन्ही मार्गावर गत ११ महिन्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या अपघातात सुमारे २०० लोकांचा बळी गेला आहे. यात सर्वात जास्त अपघात रेल्वे रुळ ओलांडताना होऊन त्यात १०८ लोकांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. तर धावत्या लोकलमधून पडून ४१ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. रेल्वे प्रशासनाकडून सदर अपघात रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असल्या तरी अनेक प्रवासी लोकल पकडण्याच्या नादात शॉर्टकट मारत असल्याने त्यांचा हकनाक बळी जात आहे.

  हार्बर आणि ट्रान्स-हार्बर या रेल्वे मार्गावरील गोवंडी ते पनवेल आणि रबाले ते जुईनगर या रेल्वे मार्गावरुन रेल्वे रुळ ओलांडून जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने या रेल्वे मार्गावर होणारे अपघात आणि त्यातील मृतांची संख्या प्रत्येकवर्षी मोठी असते. दर दोन दिवसाआड या रेल्वे मार्गावर एखाद्या प्रवाशाचा मृत्यू होत असतो. या वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यामध्ये या दोन्ही रेल्वे मार्गावर झालेल्या विविध अपघातात २०० लोकांचा मृत्यू झाल्याचे तसेच १३२ लोक जखमी झाल्याची नोंद आहे. यात सगळ्यात जास्त १०८ व्यक्तींना रेल्वे रुळ ओलांडताना आपला प्राण गमवावा लागला आहे. यामध्ये २२ महिलांचा समावेश आहे. मानखुर्द-गोवंडी, सानपाडा, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, रबाले, नेरुळ, खारघर, पनवेल या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात रुळ ओलांडून जात असल्याचे आणि याच भागात अपघाताच्या घटना घडत आहेत.

त्या खालोखाल धावत्या लोकलमधून पडून ४१ लोकांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. अनेकवेळा लोकल मधील गर्दीमुळे लोकलमध्ये दरवाजात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा धावत्या लोकल मधून पडून मृत्यू होतो. तर काही जणांचा तोल जाऊन खाली पडून मृत्यू होत असल्याचे प्रकार देखील या मार्गावर घडले आहेत. त्याशिवाय नैसर्गिक मृत्युने, आजारपणामुळे, हार्ट अटॅकमुळे आणि इतर कारणामुळे ३७ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद या वर्षात झाली आहे. सदर एकूण अपघातातील मृतांमध्ये पुरुषांची संख्या १७१ असून महिलांची संख्या २२ इतकी आहे. यातील मृतांपैकी ५२ व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नसून या बेवारस मृतांच्या नातेवाईकांचा रेल्वे पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
रेल्वे रुळ ओलांडणे, धावत्या लोकलमधून पडणे, रुळाजवळील खांब लागणे, फलाट आणि लोकलमधील अंतरामध्ये पडणे, लोकलच्या छतावर प्रवास करताना विजेचा धक्का लागणे अशी रेल्वे अपघातांची प्रमुख कारणे आहेत. प्रवाशांनी रुळ ओलांडू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केले जात असतानाही स्थानकाच्या एका फलाटावरुन दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी अनेक प्रवाशी पुलांचा, जिन्यांचा वापर न करता रेल्वे रुळ ओलांडून जात असतात. यावेळी गाडीच्या वेगाचा अंदाज न आल्याने यात अनेकांचा जीवघ्ोणा अपघात होतो.  

हल्ली लोकलमध्ये आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये नैसर्गिकरित्या मृत्यू झालेल्या बेवारस व्यक्तींचे मृतदेह सापडण्याचे प्रमाण देखील वाढू लागले आहेत. या बेवारस मृत व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत असले तरी यातील अनेक मृतांची वर्षानुवर्षे ओळख पटत नाही. त्यामुळे या बेवारस मृतांवर पोलिसांनाच अंत्यसंस्कार करावे लागत आहे. प्रत्येक वर्षी रेल्वे पोलिसांकडुन अनेक बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात.  

नागरिकांनी रेल्वे रुळ ओलांडून जाऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नेहमी आवाहन करण्यात येते. तसेच त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येत असते. मात्र, त्यांनतर देखील अनेक प्रवाशी आपल्या जीवाची काळजी न करता, रेल्वे रुळ ओलांडून जात असल्याचे दिसून येते. अनेकजण तर कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडून जात असल्यामुळे त्यांना लोकलचा हॉर्न ऐकून आल्यामुळे त्यांचा हकनाक बळी गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळांच्या बाजुला भिंत बांधून रेल्वे रुळ ओलांडणाऱ्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, त्यानंतर देखील भिंत तोडून पुन्हा नागरिक रेल्वे रुळावरुन जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींना आवरायचे कसे? असा प्रश्न रेल्वे पोलिसांसह, आरपीएफला देखील पडला आहे.    

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

ऑनलाईन गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन उच्च पदस्थ अधिक-याची फसवणूक