कारची काच फोडून कारमधील तब्बल १८ लाख रुपयांची रोख रक्कम लुटून पलायन

वाशीमध्ये ज्वेलर्स व्यवसायीकाची १८ लाख १९ हजाराच्या रोख रक्कमेची लुट  

नवी मुंबई : दागिने खरेदी व्यवहारातील बाकी असलेली रोख रक्कम घेण्यासाठी आलेल्या एका ज्वेलर्स व्यावसायीकाची स्विफ्ट डिझायर कार दोन वेगवेगळ्या दुचाकीवरुन आलेल्या त्रिकुटाने रस्त्यात अडवुन लोखंडी रॉडने त्याच्या कारची काच फोडून कारमधील तब्बल १८ लाख १९ हजार ७०० रुपयांची रोख रक्कम लुटून पलायन केल्याची घटना सोमवारी सायंकाळी वाशीमध्ये घडली. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील तिघा लुटारुं विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

या प्रकरणातील तक्रारदार वरुण मेहंद्र सोनी (३०) हा घाटकोपर येथे राहण्यास असून त्याचा ज्वेलर्सचा व्यवसाय आहे. एपीएमसी मार्केटमधिल व्यावसायीक अजय अग्रावाल यांनी वरुण सोनी याच्या ज्वेलर्स दुकानातुन काही दिवसापुर्वी दागिने खरेदी केले होते. या दागिने खरेदी व्यवहारातील अग्रवाल यांच्याकडुन १८ लाख १९ हजार ७०० रुपये येणे बाकी असल्याने सदर रक्कम घेण्यासाठी वरुण सोनी हा सोमवारी सायंकाळी एपीएमसीतील मसाला मार्केटमध्ये आला होता. अग्रवाल यांच्याकडून वरुण सोनी याने १८ लाख १९ हजार ७०० रुपये घेतल्यानंतर सदर रक्कम आपल्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये पाठीमागील सिटवर ठेवून घाटकोपरच्या दिशेने जाण्यासाठी निघाला होता.  

वरुण सोनी हा पामबीच मार्गे मुंबई पुणे हायवेच्या दिशेने जात असताना हावरे टॉवरच्या पाठीमागील वळणावर ऍक्टीवा स्कुटीवरुन आलेल्या एका लुटारुने त्याच्या कारचे कुणीतरी नुकसान केल्याचे इशाऱयाने सांगितल्याने वरुण सोनी याने आपली कार रस्त्याच्या बाजुला उभी केली. त्यानंतर तो कारमधून खाली उतरवल्यानंतर त्याठिकाणी अवेंजर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा लुटारुंनी वरुण सोनी याच्या कारजवळ येऊन लोखंडी रॉडने त्याच्या कारची काच फोडली. त्यांनतर कारमधील १८ लाख १९ हजार ७०० रुपयांची रोख रक्कम असलेली लाल रंगाची पिशवी घेऊन त्यांनी पलायन केले. या प्रकारानंतर वरुण सोनी याने वाशी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात लुटारुंविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

प्रवासी लोकल पकडण्याच्या नादात शॉर्टकट मारत असल्याने त्यांचा हकनाक बळी